नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी चव्हाण-विजयेन्द्र यांची चर्चा ! file photo
नांदेड

नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी चव्हाण-विजयेन्द्र यांची चर्चा !

भूसंपादनाची जबाबदारी कर्नाटक सरकारने उचलावी, यासाठी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी त्या राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. वाय. विजयेन्द्र यांच्याशी सोमवारी बी.वाय. चर्चा केली.

पुढारी वृत्तसेवा

Chavan-Vijayendra discuss Nanded-Bidar railway line

विशेष प्रतिनिधी

नांदेड : रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच मंजूर केलेल्या नांदेड-बिदर रेल्वेमार्गाच्या कामासाठी खर्चातील हिस्सा तसेच भूसंपादनाची जबाबदारी कर्नाटक सरकारने उचलावी, यासाठी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी त्या राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. वाय. विजयेन्द्र यांच्याशी सोमवारी बी.वाय. चर्चा केली. त्यानंतर हा विषय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे व मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी येथे दिले.

मराठवाड्यातील प्रस्तावित तसेच नांदेड ते लातूर या नव्या रेल्वेमार्गासंदर्भात खा. चव्हाण यांनी अलीकडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. नांदेड बिदर रेल्वेमार्गाच्या कामातील खर्चाचा हिस्सा आणि भूसंपादन या वाबींची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्वीकारत रेल्वे मंत्रालयाला पत्रही पाठविले; पण कर्नाटक राज्यात होणाऱ्या कामांतील खर्चाचा हिस्सा व भूसंपादन ही जबाबदारी कर्नाटक सरकारने अद्याप स्वीकारलेली नाही, असे रेल्वेमंत्र्यांनी चव्हाण यांना सांगितले होते.

कर्नाटक प्रदेश भाजपाचे अध्यक्ष असलेले आ.बी.वाय. विजयेन्द्र एका धार्मिक कार्यक्रमाकरिता सोमवारी सकाळी नांदेडमध्ये आले होते. नियोजित कार्यक्रमास जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खा. चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत तर भाजपा विरोधी बाकावर आहे. वरील रेल्वेमार्गाचे महत्त्व आणि निकड लक्षात घेऊन तेथील भाजपा आमदारांनी नांदेड-बिदर रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून राज्य सरकारची संमती मिळवावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी वरील पाहुण्यांकडे व्यक्त केली.

खा. चव्हाण यांच्या निवासस्थानी नांदेड जिल्हा रेल्वे समितीचे शंतनू डोईफोडे, पत्रकार संजीव कुळकर्णी तसेच मनपातील नगरसेवक किशोर स्वामी, महेश कनकदंडे आदी उपस्थित होते. या सर्वांनी वरील विषय मार्गी लावण्याचा आग्रह कर्नाटकच्या प्रतिनिधींकडे धरला. आ. विजयेन्द्र यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तारीख व वेळ घेतल्यास नांदेडहून एक शिष्टमंडळ पाठविण्याची तयारीही चव्हाण यांनी दर्शविली.

वरील रेल्वेमार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चातील ५० टक्के रक्कम रेल्वे मंत्रालय करणार आहे, तर उर्वरित ५० टक्के खर्चाची विभागणी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये करण्यात आली आहे. पण या दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेमध्ये असल्यामुळे समन्वय राखता आलेला नाही. परिणामी या महत्त्वाच्या नव्या रेल्वेमार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर आता बी.वाय. विजयेन्द्र यांनी त्यात लक्ष घालण्याची ग्वाही दिल्यामुळे कर्नाटक राज्य सरकारची आवश्यक ती संमती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान नांदेड-लातूर या नवीन रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती खा. चव्हाण यांनी येथे दिली. अशोक चव्हाण हे मागील काळात नांदेडचे पालकमंत्री असताना त्यांनी नांदेड-लातूर नवीन रेल्वेमार्गाचा प्राथमिक अभ्यास व अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारमार्फत या मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आला आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी खा. चव्हाण यांना सांगितले. हा मार्ग नजीकच्या काळात पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या विभागातील रेल्वे वाहतूक अधिक गतिमान होईल. तसेच नांदेड ते पुणे ह्या रेल्वे प्रवासाचे अंतरही खूप कमी होऊ शकते, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT