किनवट : किनवट तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रांवर सरासरीपेक्षा जास्त उत्पादन आणणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी मर्यादेत वाढ करत खरीप 2025 मध्ये उत्पादित कापसासाठी प्रति हेक्टर 2368 किलो म्हणजेच सुमारे प्रति एकर 9.50 क्विंटल ही उच्चतम उत्पादकता मर्यादा लागू करण्यात आली आहे.
कृषी आयुक्तालयाने 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार ही मर्यादा राज्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रांवर लागू राहणार आहे. किनवट परिसरात अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण व सिंचनाच्या माध्यमातून सरासरीपेक्षा अधिक कापूस उत्पादन घेत असतानाही, खरेदी केंद्रावर मर्यादेपेक्षा जास्त माल नेल्यास शंका, कागदपत्रांची मागणी व खरेदीतील विलंबाचा सामना करावा लागत होता.
ही मर्यादा केवळ खरीप 2025 मध्ये उत्पादित झालेल्या कापसाच्या खरेदीसाठीच लागू राहणार असून, इतर कोणत्याही कारणासाठी तिचा वापर केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे किनवट खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात अधिक उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीत कापूस विक्री करताना होणाऱ्या अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र मर्यादा वाढल्याने काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या नावाने जादा कापूस आणण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, या निर्णयाचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किनवट कापूस खरेदी केंद्रांवर काटेकोर पडताळणी व पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक ठरणार आहे.
सरासरी विचारात घेवूऊ सुधारित मर्यादा
शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा भारतीय कापूस महामंडळाने पीक कापणी प्रयोगांच्या आधारे राज्यस्तरावर उत्पादकता निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महसूल मंडळांतील 12 पीक कापणी प्रयोगांच्या आकडेवारीवर आधारित मूल्यांकन करून राज्यातील उच्च उत्पादकतेच्या तीन जिल्ह्यांची सरासरी विचारात घेत ही सुधारित मर्यादा ठरविण्यात आली आहे.