Crime News : नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्याचाच दुसऱ्या सराफावर दरोडा file photo
नांदेड

Crime News : नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्याचाच दुसऱ्या सराफावर दरोडा

३ किलो चांदीसह ४ आरोपी गजाआड; जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रचला लुटीचा डाव !

पुढारी वृत्तसेवा

Bullion trader robs another bullion trader in Nanded

नांदेड पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक आणि जुन्या वादाचा राग मनात धरून एका सराफा व्यापाऱ्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा आणि लिंबगाव पोलीसांनी अत्यंत नियोजनबद्ध व शिताफीने तपास करत अवघ्या काही दिवसांतच या गुन्ह्याचा छडा लावला. मुख्य आरोपी सराफा व्यापाऱ्यासह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, चोरीस गेलेली ३ किलो चांदी व बॅग असा एकूण ६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत (जि. हिंगोली) येथील सराफा व्यापारी अक्षय चंद्रकांत कुलथे याचा नांदेडचे सराफा व्यापारी खेतसिंह राजपूत यांच्याशी जुना वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी कुलथे याने राजपूत यांना लुटण्याचा कट रचला. त्यानुसार २९ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास 'शिवम बार' परिसरात फिर्यादीची दिशाभूल करून त्यांच्या जवळील चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून आरोपी पसार झाले होते. या बॅगेत सुमारे ६ लाख ८१ हजार रुपये किमतीचे ३ किलो चांदीचे दागिने होते.

याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, ३ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या चोरीतील आरोपी मालेगाव रोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबी आणि लिंबगाव पोलिसांनी संयुक्त मोहीम आखत मालेगाव रोडवर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउनि मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, रितेश कुलथे, पोकों चंद्रकांत स्वामी, अझरुद्दीन शेख, अनिल बिरादार तसेच लिंबगाव पोलीस ठाण्याचे सपोनि बोधनकर, पोहेकॉ रितेश टाक, प्रदीप गर्दनमारे आणि बालाजी तेलंग यांच्या पथकाने केली.

ताब्यात घेतलेले आरोपी

१) अक्षय चंद्रकांत कुलथे (वय २१, रा. झेंडा चौक, वसमत, जि. हिंगोली - मुख्य आरोपी व सराफा व्यापारी) २) साहिल ओंकार केंजकर (वय १९, रा. सन्मीत्र कॉलनी, नांदेड) ३) गोपाल विवेक रापतवार (वय २१, रा. सोमवारपेठ, वसमत, जि. हिंगोली) ४) एक विधीसंघर्ष बालक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT