BJP, Marathwada Janhit Party are at the top.
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व हिमायतनगर नगरपंचायतीसह १३ संस्थांवर भारतीय जनता पार्टी व मराठवाडा जनहित पार्टी अव्वलस्थानी राहिले आहेत; पण चार आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषदांत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. भाजपा-मजपा ५, राष्ट्रवादी काँग्रेस-३, काँग्रेस-२, शिव सेना शिंदे गट-२ आणि उबाठा-१ असे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता सुरु झाली. दुपारपर्यंत सर्व नगरपरिषदांमधील चित्र स्पष्ट झाले. खा. अशोक चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भोकर आणि मुदखेड या दोन्ही नगरपरिषदांसह कुंडलवाडीमध्ये भाजपाने वर्चस्व कायम राखले. भोकरमध्ये भगवान दंडवे आणि मुदखेडमध्ये विश्रांती माधव कदम या दोन्ही भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.
कुंडलवाडीत भाजपाने नांदेड निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असले, तरी विजयाचे सर्व श्रेय अमरनाथ राजूरकर यांना जाते. येथे भाजपच्या प्रेरणा कोटलावार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. बिलोलीमध्ये भाजपाने पक्ष चिन्हावर एकही उमेदवार उभा केलेला नव्हता, तेथे नोंदणीकृत मराठवाडा जनहित पार्टीला भाजपच्या एका गटाने छुपा पाठिंबा दिला होता. येथे नगराध्यक्षपदाचे मजपाचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांनी बाजी मारली.
धर्माबादमध्ये मजपाच्या संगीता बोल्लमवाड या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयी झाल्या असून भाजपाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. मजपाने १४ जागा पटकावून नगरपरिषदेवर झेंडा फडकविला आहे. लोहा नगरपरिषदेसाठी खा. अशोक चव्हाण यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरवित आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला 'प्रताप' दाखवून दिला. कंधारमध्ये मात्र चिखलीकरांच्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले.
लोहा तसेच मुखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होऊनही मतदारांनी दोन्ही ठिकाणी भाजपला स्वीकारले नाही. मुखेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. विजया देबडवार यांनी विजयोत्सव साजरा केला. बहुचर्चित देगलूर नगरपरिषदमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर झाली. सुरुवातीच्या काही फेरीत येथे काँग्रेसच्या मनोरमा निलमवार आघाडीवर होत्या; परंतु शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विजयमाला टेकाळे यांनी त्यांची आघाडी मोडीत काढून विजयावर शिक्कामोर्तब केला. आ. राजेश पवार यांना धर्माबादपाठोपाठ उमरीमध्येही जबर दणका बसला आहे. उमरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शकुंतला मुदिराज यांनी भाजपाच्या स्वप्ना माचेवाड यांना पराभूत केले.
हदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी भास्कर वानखेडे यांनी काँग्रेसच्या कुमुद सुनील सोनुले यांचा पराभव करून काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले आहे. हिमायतनगरमध्ये भाजपचा धक्कादायक पराभव झाला असून येथे काँग्रेसचे उमेदवार शेख रफीक शेख महेबुब यांनी दणदणीत विजय मिळविला. तर किनवटमध्ये आ. भीमराव केराम यांना मतदारांनी दणका देत उबाठा गटाच्या सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली.
जिल्ह्यातील भाजपाचे भीमराव केराम, राजेश पवार, तुषार राठोड आणि जीतेश अंतापूरकर या चारही आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषदांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. मुखेडमध्ये तुषार राठोड यांच्या आग्रहाखातर प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी सभा घेवूनही त्याचा काहीच परिणाम झाला नाही. नगरपरिषदांमधील अपयश आगामी जि.प.निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.