विशेष प्रतिनिधी
नांदेड : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी नांदेडच्या तीन संघटनात्मक जिल्ह्यांसाठी 'कोअर कमिटी' जाहीर केली आहे. ज्येष्ठ नेते व राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांना केवळ नांदेड महानगरापुरते मर्यादित ठेवताना खा. अजित गोपछडे यांना मात्र 'दुहेरी मुकुट' बहाल करण्याची 'दक्षता' घेण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच भाजपाने राज्यातील वेगवेगळ्या प्रकोष्ठांच्या संयोजकांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किनवटचे सुधाकर भोयर यांचे पुनर्वसन केले होते. नांदेडच्या सान्वी जेठवाणी यांची नियुक्ती तृतीयपंथींच्या प्रकोष्ठ संयोजकपदी करण्यात आली. त्यानंतर आता वेगवेगळ्या संघटनात्मक जिल्ह्यातील कोअर कमिटी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपाने नांदेडमध्ये ग्रामीण भागासाठी दक्षिण आणि उत्तर असे दोन संघटनात्मक जिल्हे निर्माण केले असून नांदेड शहराच्या कार्यकारिणीलाही जिल्ह्याचा दर्जा आहे. शहर जिल्ह्याच्या कोअर कमिटीत जिल्हाध्यक्ष अमर राजूरकर यांच्याशिवाय पक्षाच्या पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. संजय कौडगे आणि चैतन्य देशमुख या प्रदेश उपाध्यक्षांसोबत अशोक चव्हाण व अजित गोपछडे या राज्यसभा सदस्यांसह महापौर कविता मुळे यांनाही स्थान मिळाले. तसेच माजी जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनाही या कोअर कमिटीत घेण्यात आले आहे.
नांदेड दक्षिण जिल्हा कोअर कमिटीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांच्याशिवाय पाच सरचिटणीस तसेच त्या कार्यक्षेत्रातील डॉ. तुषार राठोड, राजेश पवार व जीतेश अंतापूरकर या आमदारांना स्थान देताना डॉ. अजित गोपछडे यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले. गोपछडे यांचे मूळ गाव देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात आहे, ही बाब विचारात घेऊन त्यांना या कमिटीत घेण्यात आले; पण भोकर मतदारसंघाशी जुने ऋणानुसंबंध असतानाही खा. अशोक चव्हाण यांना उत्तर जिल्हा कोअर कमिटीत स्थान मिळाले नसल्याचे दिसून आले. आ. भीमराव केराम व आ. श्रीजया चव्हाण यांचा वरील कमिटीत समावेश असल्याचे दिसून येते.
पक्षाने नांदेड शहर जिल्ह्याच्या प्रभारीपदी संभाजी पाटील निलंगेकर, दक्षिण जिल्ह्यासाठी रेखा कुलकर्णी आणि उत्तर जिल्ह्यासाठी किरण पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांचा त्या-त्या कोअर कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. उत्तर जिल्ह्याच्या कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते किंवा माजी खासदार-आमदार यांच्यातून कोणाचाही समावेश नाही. माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांचे गाव त्या क्षेत्रातले असले, तरी त्यांचा विचार झाला नाही.