नायगाव : भाजपचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून श्रावण पाटील यांची ओळख आहे. सुख दुःखाच्यावेळी सोबत असणारा खरा मित्र कसा असावा, याचे तो उत्तम उदाहरण आहे. श्रावण पाटलासारख्या नेत्याला जोपासणे ही जनतेची, कार्यकर्त्यांची आणि माझी जबाबदारी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी काढले.
नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी श्यामनगर नरसी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा यावेळी चिखलीकर यांनी श्रावण पाटील यांना दिल्या. यावेळी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी' योजनेचे अर्ज भरण्याचा शुभारंभ चिखलीकर यांच्या हस्ते झाला. भास्करराव पाटील खतगावकर यांनी सर्व राजकीय मतभेद विसरून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले होते.
नायगाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या होटाळकर, कवळे गुरुजी, बचेवार आणि श्रावण पाटील या चारही जणांनी एकोपा ठेवा. तुमच्यातीलच एकाला उमेदवारी दिली जाईल, असे अश्वासन यावेळी माजी खा. चिखलीकर यांनी दिले. तीर्थ यात्रेला मतदारांना नेऊन लोकांना भुलविण्यापेक्षा लोकांचा विकास करा, असा खोचक टोला चिखलीकर यांनी आमदार राजेश पवार आणि पूनम पवार यांना लगावला.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी राजकारणातील किस्से सांगत राजकारणाच्या दिलंजमाईचे उदाहरण दिले. राजकारणात सर्व माफ असते, श्रावण यांच्या वाढदिवसाला आपण सर्वकाही विसरून उपस्थिती लावल्याचे त्यांनी सांगितले. श्रावण पाटील यांच्या वडिलांनी विधानसभा तिकीट मिळावे, यासाठी शंकरराव चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला होता, असेही ते म्हणाले.
नरसी येथे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, बाळु खोमणे, गिरीश जाधव, शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार, मारोतराव कवळे गुरुजी, विजय गंभीरे, अशोक पाटील मुगावकर, लक्ष्मण ठकरवाड, डॉ. शिवाजी कागडे, अशोक पाटील वडजे, डॉ. अमोल पाटील ढगे, बाबाराव पाटील रोकडे, शिवराज पाटील गाडीवान, बाबुराव अडकिने, शिवाजी वडजे, उमाकांत देशपांडे, भगवान लंगडापुरे, निर्मला ताई धुपेकर, मोहनराव पाटील धूपेकर, शंकर कल्याण, धनराज शिरोळे, गजानन श्रीमनवार, शैलेश कऱ्हाळे, संजय अंभोरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रावण पाटील भिलवंडे यांनी राजकीय जीवनातील चढ उतार सांगताना प्रत्येक परिस्थितीत भाजप सोबत एकनिष्ठ कसे राहिलो याचा पाढा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी शिवराज होटाळकर, बालाजी बचेवार, अशोक पाटील मुगावकर, गिरीश जाधव, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, डॉ. धनाजीराव देशमुख यांनी आपले समायोचीत भाषणे केली. सर्वांनी श्रावण यांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा दिल्या.
श्रावण पाटील भिलवंडे यांना जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यामध्ये विशेष म्हणजे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लावलेल्या हजेरीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर भिलवंडे व खतगावकर यांच्यात राजकीय द्वेष निर्माण झाला होता. ही राजकीय कटूता विसरून भास्करराव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेली उपस्थिती मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.
कार्यक्रमाचे संचलन भुषण पारळकर यांनी तर आभार धनराज शिरोळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सरपंच आनंद बावणे, विजय होपळे, गोविंद कुंटूरकर, राजेश शिंदे, डॉ. अमोल ढगे, गजानन श्रीरामवार, अशोक पाटील वडजे, शिवराज पाटील गाडीवान, बालाजी सावकार चींतावार, मारोतराव पाटील भिलवंडे, पपू अकमवाड, राम कांबळे मुगावकर, राम खणपटे, डी. एम. भिलवंडे, गोविंद टोकलवाड, जाफर सयद, खलिल शेख, राजेश नागेश्वर वडजे, राजेश वडगावे, माजी सरपंच गजानन भिलवंडे, वेंकट कोकने, त्र्यंबक डाके भिसे, चांद खा. पटेल आदींनी परिश्रम घेतले.