विठ्ठल फुलारी
भोकर : गरजेच्यावेळी आर्थिक मदतीचा हात म्हणून घेतलेल्या पैश्याला भोकरमध्ये बॅंकेच्या कितीतरी पटीने व्याज आकाराला जातो. वर्षाला कुठे दिडी तर कुठे सवई आणि महिने वारीमध्ये शेकडा दहा ते पंधरा टक्के व्याज आकाराला जात आहे. हा खाजगी सावकारीचा विळखा बसत असल्याने अनेकांना कर्ज फेडतांना नाकीनऊ येत असून कर्जबाजारी झालेले काही जणांनी घरं विकली तर काही जण गावे सोडली.
महाराष्ट्रात बेकायदेशीर व अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ हा कायदा लागू झाला असला तरी आजही खाजगी सावकारी चालू आहे. भोकर शहरात तर खासगी सावकारीचा पेव फुटला आहे. एखाद्या अडल्या नडलेल्याला मदत करणं बंद झाले असून टक्केवारीची भुरळ पडली असल्याने अनेकांनी हा व्यवसाय चुपचुपके सुरू ठेवला आहे.
कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ही सावकारकी चुपचाप होत असली तरी वसुली मात्र नरडीचा घोट धरून केली जाते. स्वतः श्रीमंत होण्यासाठी सुरू झालेली सावकारी चा व्याज सारखा आकारला जात नाही. कुठे दिडी ने पैसे दिले जातात. कुठे सवइ ने घेतले जातात. महिनेवारीची टक्केवारी शेकडा दहा ते पंधरा असते. व्याजाचे काढलेल्या व दररोज पैसे जमा करणाऱ्या कर्जदारांची कहाणी तर भयावह आहे.
छोटे व्यावसायिक, ॲटो चालक यांचा यात सहभाग यात आहे. एका व्यक्तीकडून दहा हजार रुपये घेतले तर त्यातील दोन हजार रुपये अगोदरच कापुन घेतले जातात. दररोज १०० रूपये भरावे लागत असून काही कारणास्तव खाडा पडला तर त्याला हि व्याज आकाराला जातो. यामुळे जे व्याजाने कर्ज घेतात त्याची माती होत असून देणारे इमले उभे करत असल्याचे चित्र दिसत आहे.
नातं नाही, पैसा महत्त्वाचा...
सावकारी करणाऱ्यास कसलंच नातं नसतं. रक्ताचं नातं असलं तरी त्याला व्याजाची रक्कम भुरळ घालत असते. सामाजिक कामाचा मुखवटा धारण करून काही जण हा व्यवसाय थाटात करत असतात. यांना ही नात्यापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो. दररोज ची वसुली करणाऱ्यांनी आपल्या वसुलीसाठी कुठं दुकान तर कुठे पानटपरीवर डायऱ्या ठेवून वसुली करत असतात. एकंदरीत देताना तुझं काम काढतोय म्हणणारे वसुली मात्र नरडीचा घोट धरून करतात.
उतरलेले चेहरे...
अनेकवेळा या जाचाविरोधात कुठे दाद मागायची, काय करायचं हेच माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तीसमोर अडचणीचा डोंगरच उभा राहतो. गरजेपोटी घेतलेलं कर्ज हे अक्षरशः आपल्या मरणाचं कारण बनलंय अशी जाणीव त्या व्यक्तीला होऊ लागते. त्या व्यक्तीचं आयुष्य बदलत जाते. समाजात मानहानी सहन करावी लागते. यातना सहन करत जगावं लागत असल्याचे चित्र भोकर तालुक्यातील अनेक कर्जबाजारी झालेल्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघितले की लक्षात येते.