Parbhani municipal employees strike : मनपा कर्मचार्‍यांचा आंदोलनाचा २३ वा दिवस; आज रास्‍ता रोको

मनपाचे दैनंदिन कामकाज ठप्‍प; आंदोलनाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
Parbhani municipal employees strike
Parbhani municipal employees strikepudhari photo
Published on
Updated on

परभणी : वाढीव जीएसटी अनुदान मिळावे आणि थकीत वेतन अदा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी (दि.१) २३व्या दिवशीही सुरूच होते. आज २ सप्‍टेंबर रोजी मनपा कर्मचारी मनपा कार्यालय परिसरात रास्‍ता रोको आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे मनपाचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नसल्‍यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये संतप्‍त भावना दिसून येत आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला सुट्यांचा कालावधी धरून २३ दिवस पूर्ण झाले आहेत. यापूर्वीदेखील याच मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या कार्यकाळात १७ दिवस आंदोलन केले होते. त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनपा अधिकारी-कर्मचार्‍यांवर आंदोलनाची वेळ आली असून आंदोलनाच्‍या २३व्‍या दिवशीही तोडगा न निघाल्‍यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतप्‍त भावना निर्माण झाल्‍या आहेत.

Parbhani municipal employees strike
Parbhani sugarcane crop pest : फुलकळस शिवारात ऊसावर पिठ्या ढेकूण, पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव

आंदोलनाच्या काळात मनपा प्रशासनाकडून केवळ वर्ग-४ संवर्गातील कर्मचाऱ्यांचा एक पगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे. मात्र, वर्ग-३ सह अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे तब्बल ५ महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून संघटनांसह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनीही मुंबईत शिष्टमंडळाच्या माध्यमातून संबंधितांकडे मागण्या मांडल्या. मात्र, विविध स्तरांवर प्रयत्न होऊनही वेतन व अनुदानाच्या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा निघाला नाही. मनपाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेचे आंदोलनास महापौर सय्यद इकबाल व नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शविलेला आहे.

Parbhani municipal employees strike
Jalna News : तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

कचर्‍याचे ढिगारे साचले

मागील २३ दिवसांपासून मनपा कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू असून यामुळे कचरा संकलनासाठी असलेल्‍या घंटागाड्या‌ बंद असल्‍यामुळे अनेक ठिकाणी कचर्‍यांचे ढिगारे साचले आहेत. कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनाचा परिणाम शहरातील स्‍वच्‍छता व सर्वच घटकांवर झाल्‍याचे दिसून येत आहे.

कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट

मनपातील ७०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे जवळपास ५ महिन्यांचे नियमित वेतन थकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि दैनंदिन गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. किराणा, दूध, भाजीपाला तसेच औषधोपचारासाठी लागणारा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. अनेकांकडून उधारी घेऊन घरखर्च भागविण्याची वेळ आली असून, आता उधार देण्यासही कोणी तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिरंगाईच्या निषेधार्थ हातात भिकेची टोपली घेऊन सुरू केलेले हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news