Nanded News : सहस्रवर्षा वटवृक्ष संवर्धनाची सुरुवात file photo
नांदेड

Nanded News : सहस्रवर्षा वटवृक्ष संवर्धनाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिन; 'सेवा समर्पण परिवारा'चा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Bhokar Banyan tree planting initiative

भोकर, पुढारी वृत्तसेवा : मागील काही वर्षांत बेसुमार झालेली वृक्षतोड, त्यामुळे निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून सेवा समर्पण परिवार निसर्गाच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करीत आहे. कधी जलसंधारण तर कधी वृक्षारोपण करण्यासाठी घामासोबत खिसा रिकामा करीत आहे. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी वटवृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमात सातत्य रहावे, यासाठी 'सेवा समर्पण परिवार' ने 'सहस्रवर्षा वटवृक्ष संवर्धन' हा उपक्रम सुरू करून चार वर्षे झाली आहेत. यावर्षी या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनापासून होत आहे.

मागील काही वर्षांपासून होत असलेली वृक्षतोड आता पर्यावरणावर विपरीत परिणाम करत आहे. यामुळे वृक्षलागवड करुन त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी वटवृक्ष लागवड करण्याचा उपक्रम नांदेडच्या तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी तथा मुंबई येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर चार वर्षापूर्वी घेतला होता.

या उपक्रमात सातत्य रहावे आणि दरवर्षी वटवृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करून ती जोपासली जावी, यासाठी 'सेवा समर्पण परिवार' सहस्त्रवर्षा वटवृक्ष संवर्धन या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत मागील तीन वर्षात दोन हजारच्यावर वटवृक्ष लावून त्याचे संवर्धन केले. या वर्षीही जागतिक पर्यावरण दिनी वटवृक्ष लावण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहस्त्रवर्षा वटवृक्ष संवर्धन या उपक्रमाची सुरुवात केली जाणार असून जिल्हा परिषद नूतन शाळेच्या प्रांगणात पाच वडाची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वटवृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.

वडाचे झाड एका तासाला साधारणपणे ७१२ किलो या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असते, याचबरोबर तापमान नियंत्रित करते यामुळे वटवृक्षाचे महत्त्व असल्याने वटवृक्षाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. 'सेवा समर्पण परिवार'ने सुरु केलेल्या सहस्त्रवर्षा वटवृक्ष संवर्धन या उपक्रमात वटवृक्ष लावून त्याचे संवर्धन केले जाते हा एक निसर्गाच्या उन्नतीसाठी होत असलेल्या प्रयोग इतर ठिकाणीही झाला तर खऱ्या अर्थान पर्यावरण दिन साजरा होईल.

तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी तथा मुंबई येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या नावाने सुरू केलेल्या सहस्त्रवर्षा वटवृक्ष संवर्धन या उपक्रमाला आता चार वर्षे झाली आहेत. मागील चार वर्षांत भोकर येथील शाहू विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, खडकी, जामदरी टेकडी, नारवट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवृक्ष लावून त्याचे संगोपन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा आमचा अल्पसा प्रयत्न आहे.
दिगंबर देशमुख, अध्यक्ष, सेवा समर्पण परिवार, भोकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT