उमरखेड:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे 'प्रहार'चे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या 'सात-बारा कोरा' पदयात्रेचा समारोप थेट राष्ट्रीय महामार्गावर केल्याप्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या १२ साथीदारांवर महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.
बच्चू कडू यांची 'सात-बारा कोरा' पदयात्रा महाराष्ट्रात फिरत होती. सोमवारी या यात्रेचा समारोप महागाव तालुक्यातील आंबोडा गावात होणार होता. यासाठी श्री गजानन महाराज मंदिरात सभेची तयारी करण्यात आली होती.
पण ऐनवेळी बच्चू कडू आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी प्लॅन बदलला. त्यांनी थेट नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या (NH 361) उड्डाणपुलावरच सभा सुरू केली. महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या प्रकरणी पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार:
सभेला आंबोड्यातील मंदिरात परवानगी होती, महामार्गावर नाही.
पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांना रस्त्याच्या एका बाजूने चालण्याची वारंवार सूचना देऊनही त्यांनी ऐकले नाही.
सुमारे ५ ते ७ हजार लोकांचा जमाव आणि ३०-४० ट्रॅक्टर घेऊन बेकायदेशीरपणे महामार्ग अडवण्यात आला.
कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वाहतूक थांबवून लोकांची गैरसोय केली आणि नियमांचे उल्लंघन केले.
याच कारणांमुळे, बेकायदेशीरपणे जमाव जमवून राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी बच्चू कडू आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.