

Nanded Governor Haribhau Bagde Ayodhya History
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : इतिहास घडला पाहिजे आणि इतिहास घडवता येतो. ६ डिसेंबर १९९२ साली तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अयोध्येत इतिहास घडला. कारसेवकांनी अयोध्येतील तीन घुमट पाडताना या दोन्ही नेत्यांची बैठक झाली, त्यांच्या मनात काय होते, ते देव जाणे, असा गौप्यस्फोट राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सत्काराला उत्तर देताना केला.
येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सोमवारी (दि.१४) राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, सचिव बनिता जोशी, प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी, उपप्राचार्या कल्पना कदम आदींची उपस्थिती होती. राज्यपाल बागडे यांनी या कार्यक्रमात राजकीय भाषणच केले.
राज्यपाल बागडे यावेळी म्हणाले, 'डॉ. शंकरराव चव्हाणांनी गृहमंत्री या नात्याने अयोध्येचा दौरा केला, तेथे मशीद कुठे आहे? असे त्यांनी बिचारले तेव्हा लोकांनी मशीद नाही केवळ तीन घुमट आहेत, तेथे नमाज अदा होत नाही, असे सांगितले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत घडत असलेल्या प्रसंगांमुळे तेथे लष्कर पाठविण्याच्या मागणीसाठी शरद पवार आणि एक खासदार पंतप्रधान नरसिंहराव यांच्या भेटीला गेले; तेव्हा नरसिंहराव देवपूजा करीत असल्याचा निरोप त्यांना मिळाला.
नरसिंहराव पूजा आटोपून बाहेर आले, तोपर्यंत अयोध्येत इतिहास घडला होता' असे त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करून राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संबैधानिक जबाबदारी सांभाळतानाच मराठवाड्याच्या विकासाला गती देण्याचे मोलाचे काम केल्याचे सांगून त्यांच्या कारकीर्दीची प्रशंसा केली.
खा. अजित गोपछडे, संस्था अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी महाविद्यालयाच्यावतीने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसंघात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रभृतींनी कधी पायी तर कधी सायकलवरून प्रवास करून पक्षाचा प्रचार केला. प्रचारकांना विरोधक भाषणातून टोमणे मारायचे, हिणवायचे; पण अनेक अडचणींचा सामना करत ही माणसे आपल्या विचारांवर ठाम राहिली. तत्वांशी कुठलीही तडजोड न करता स्वतःचा, परिवाराचा विचार न करता आपले संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्राला समर्पित केले, त्यांची नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, कष्टाचे, परिश्रमाचे आणि चिकाटीचे फळ आज आपल्याला मिळाले आहे.