

उमरखेड : शेतकर्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे प्रहार संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या ‘सातबारा कोरा यात्रा’ चा समारोप अंबोडा(ता,महागाव) येथे सोमवारी (दि,१४) जनसामान्यांच्या प्रचंड सहभागाने पार पडला. या समारोपप्रसंगी बच्चू कडूंनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “सातबारा कोरा न झाल्यास शासनाला स्वस्थ बसू देणार नाही.” त्यांनी शासनाला इशारा दिला की जर लवकरच निर्णय घेतला गेला नाही, तर ‘सातबारा आंदोलन’ अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूप घेईल.
सातबारा उताऱ्यावरून शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातील पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ गावातून ही यात्रा काढण्यात आली. 138 किमी पायी मार्गक्रमण करत, देशातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या महागाव तालुक्यातील गव्हाण या साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या गावात या यात्रेचा समारोप करण्यात आला. या यात्रेदरम्यान बच्चु कडूंनी शेकडो शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या, शासनाचे दुर्लक्ष समोर आणले आणि जनजागृती केली.
हा समारोप कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यात अंबोडा येथे पार पडला. यावेळी हजारो कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, विजेची सवलत, आणि शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या समारोपावेळी देण्यात आले.
या समारोप सोहळ्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असून, या आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या यात्रेच्या समारोपीय सभेत, आमदार रोहित आर पाटील, माजी आमदार राजेंद्र नगरधने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम ,काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज सेलचे राज्य समन्वयक साहेबराव कांबळे आदिसह, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.