नांदेड ः भाजपाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते. pudhari photo
नांदेड

Nanded Waghala Municipal Election Results : नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‌‘अशोक पर्व!‌’

45 जागांसह स्पष्ट बहुमत ः एमआयएमचे दमदार पुनरागमन

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड नगर परिषद ते नांदेड-वाघाळा महानगरपालिका या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या शहराच्या या मध्यवर्ती संस्थेमध्ये खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाला हद्दपार करत भाजपाचे कमळ फुलविण्याची अवघड मोहीम शुक्रवारी फत्ते केल्यानंतर शहर आणि जिल्हाभर या विजयाचा आनंदोत्सव भाजपाने साजरा केला.

या मनपाच्या 20 प्रभागांतील 81 जागांपैकी भाजपाने 66 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 45 जागा जिंकून या पक्षाने ऐतिहासिक शहरामध्ये संस्मरणीय विजयाची नोंद केली. गेल्या निवडणुकीत मनपातून हद्दपार झालेल्या एमआयएमने दमदार पुनरागमन करत 24 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या नेतृत्वहिन काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर फेकले आहे. तर दोन आमदार असूनही शिवसेनेची तसेच प्रचारादरम्यान नांदेडचा कारभारी बदलण्याचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीमध्ये धूळधाण उडाली आहे.

तिसाव्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मनपामध्ये भाजपाचा महापौर होणार ही बाब आनंददायी असून मी केलेल्या आवाहनाला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खा.अशोक चव्हाण यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेल्या मनपाच्या 20 प्रभागांपैकी 9 प्रभागांतील चारही जागा जिंकून भाजपाने या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी बजावली. काँग्रेस-वंचित आघाडीला अशी कामगिरी तीन प्रभागांमध्ये करता आली. हे वृत्त लिहित असेपर्यंत काँग्रेस-वंचित आघाडीने मिळून 15 जागा जिंकल्या असल्याचे सांगण्यात आले.

मनपा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून पाचशेजणांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने चालल्यामुळे सर्व निकाल येण्यास सायंकाळ उलटून गेली होती. सर्व जागांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत शहरभर आनंदोत्सव साजरा केला, तर दुसरीकडे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांत सुतकी अवकळा पसरली होती.

निवडणूक यंत्रणेच्या संथ कारभारामुळे सर्व प्रभागांतील सविस्तर निकाल हाती आले नाहीत; परंतु भाजपाने या निवडणुकीत उतरवलेले बलवंतसिंघ गाडीवाले, जयश्री पावडे, शीला भवरे, शैलजा स्वामी हे चार माजी महापौर तसेच सतीश देशमुख हे माजी उपमहापौर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी हे प्रमुख उमेदवार आपापल्या प्रभागांत विजयी झाले. 1997 पासून मनपात असलेले वीरेन्द्रसिंघ गाडीवाले हे सहाव्यांदा विजयी झाले; पण भाजपाकडून लढलेल्या माजी महापौर मोहिनी येवनकर यांना शिवाजीनगर प्रभागात पराभवाचा धक्का बसला.

काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आनंद चव्हाण, या पक्षाचे माजी नगरसेवक मुन्ना अब्बास, माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या पत्नी ज्योती पांढरे, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे पुत्र अभिलाष पावडे हे पराभूत झाले आहेत. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे पुत्र सुहास कल्याणकर हे तरोडा प्रभागातून विजयी झाले. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या मीनल गजानन पाटील या प्रभाग क्र.3मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.

आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी बराच जोर लावला होता; पण या पक्षाला केवळ एक जागा मिळाल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत एमआयएमने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसचेच काही माजी नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये गेले. त्यांतील बहुतांश उमेदवार विजयी झाले. बिलोली-धर्माबाद नगरपरिषदेत सत्तेमध्ये आलेल्या मजपाने नांदेडमध्ये चार जागा लढविल्या; पण या पक्षाची कपबशी काँग्रेसच्या हातांनी फोडून टाकली.

  • मी नांदेडकराचा मनापासून आभारी आहे. हे यश नांदेडकरांच्या विश्वासाचं, मोदीजी, देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं आहे आणि भाजपचे आमचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या मेहनतीचं आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नांदेडकरांचा कौल विकासाला, सकारात्मकतेला असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नव्हते... फक्त अपप्रचार करून शिव्याशाप देणे या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नव्हते. मतदारांना नकारात्मकता आवडत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT