

जालना : जालना महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी उमेदवार व त्यांच्या समर्थकांसह रस्तेही गुलालाने न्हाऊन निघाल्याचे दिसून आले.
जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाला. महापालीकेच्या 65 जागांपैकी तब्बल 41 जागांवर भाजपाचेच उमेदवार विजयी झाल्याने जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचाच होणार हे निश्चित झाले आहे.जालना महापालिकेचा गड सर करण्यासाठी जालन्यात भाजाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चांगली व्यूव्ह रचना केली.
जालना पालिकेवर मजबूत पकड असलेल्या काँग्रेसचे माजी आ.कैलाश गोरंट्याल यांना भाजपात पक्ष प्रवेश देत महापालिकेवर विजयाची मुहूर्तमेढ रोवली. भाजपाची वाढलेली ताकद लक्षात घेउन भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेने सोबत जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवत असतानाच त्यांनी प्रत्येक प्रभागात असलेल्या भाजपाच्या इच्छकांची चाचपणी केली.
माजी आ.कैलाश गोरंट्याल यांच्यामुळे शहरात वाढलेल्या ताकदीचा भाजपाला मोठा फायदा या निवडणुकीत झाला. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्करराव दानवे यांनीही मागील काही दिवसांत शहरातील विविध प्रभागांत संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. भाजप कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क व त्याला शिस्तबध्द प्रचाराच्या जोडीसोबत साम, दाम, दंड व भेदाची वापरलेली नीती यामुळे भाजपाने गोरंट्याल यांच्या मदतीने एक हाती सत्ता खेचून आणली.
भाजपाच्या तुफानात राष्ट्रवादी अजित पवार व शरद पवार या दोन्ही पक्षाची वाताहात झाली. भाजपाच्या तुफानातही शिवसेना शिंदे पक्षाचे आ.अर्जुनराव खोतकर यांनी 9 उमेदवार निवडून आणत शिवसेनेचे वर्चस्व सिध्द केले. काँग्रेसला भाजपाच्या वादळात 9 जागांवर समाधान मानावे लागले.
एमआयएमचा प्रवेश
जालना शहर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत एमआयएमचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.या निवडणुकीत मतदान कमी होऊनही त्याचा फायदा भाजपाला फायदा मिळाल्याचे दिसून आले.निवडणुकीत भाजपाने उमेदवारी दिलेले मुस्लिम उमेदवारही विजयी झाले.
फटाक्यांच्या आतिषबाजीने शहर दणाणले
जालना शहर महापालिका निवडणूक निकालानंतर शहरातील विविध भागांत विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केल्याने शहर दणाणून गेले होते.