Ardhapur taluka was the worst hit by the rains
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
अर्धापूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे अनेक गावांतील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यानंतर खा. रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१०) त्या भागात जाऊन पाहणी केली. दुसरे खासदार अशोक चव्हाण गुरुवारी (दि.१२) नुकसानीची पाहणी करणार आहेत, असे सांगण्यात आले.
गेल्या सोमवारी सायंकाळनंतर नांदेड महानगर, अर्धापूर-मुदखेड परिसर यांसह जिल्ह्यातल्या अनेक भागांना 'मृगा'च्या पहिल्या पावसाने तडाखा दिल्यानंतर बाधित भागातील राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण प्रभृतींना हानीची माहिती कळविली. खा. चव्हाण मागील १० दिवस मुंबईत होते. ते आता गुरुवारी अर्धापूर-मुदखेड भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मंगळवारीही जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार वार्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तरी मागील दोन दिवसांतल्या नैसर्गिक आपत्तीत कोठेही जीवित हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच्या वादळी वार्यांचा अर्धापूर तालुक्यात ५१ गावांना तडाखा बसला. त्यात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील काही बाधित गावांना मंगळवारी दुपारनंतर भेट देऊन उद्वस्त झालेल्या केळीच्या बागांची पाहणी केली. त्यानंतर भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या काही समर्थकांनीही काही गावांना भेट देऊन तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अर्धापूर तालुक्याला लागूनच असलेल्या हदगाव तालुक्यातील काही गावांतील फळबागांना वादळवार्यासह झालेल्या पावसाचा तडाखा बसल्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत देव-सरकर यांनी मुंबईमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.
थेट खा. पवारांशी संपर्क बारड येथील कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागांच्या नुकसानीसंदर्भात ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधत, त्यांना सर्व माहिती दिली. त्यावर पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या भागास भेट दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.