

Farmers Protest Shiv Sena Thackeray
किनवट : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (दि.11) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने किनवट येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला शहरातील गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानातून सुरुवात झाली. शेकडो बैलगाड्यांसह निघालेल्या या मोर्चाने फुले चौक, शिवाजी चौक, जिजाऊ चौक मार्गे गोकुंदा रस्त्यावरील उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत परिवर्तित झाले.
प्रमुख मार्गदर्शकांच्या भाषणातून सरकारवर फसव्या व घोषणात्मक धोरणांबाबत जोरदार टीका झाली. उपनेते बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे, किनवट तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी या वेळी आपली भूमिका मांडली. प्रास्ताविक युवासेनेचे शहराध्यक्ष प्रशांत कोरडे यांनी केले.
यावेळी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांसाठी दिलेली अनेक आश्वासने केवळ कागदापुरती राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जमाफी, हमीभाव, पाणंद रस्ते, पीकविमा, खतावरील जीएसटी परतावा, सन्मान योजना, ऊर्जा प्रकल्प अशा अनेक योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई, गोंधळ आणि भ्रष्टाचार दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांप्रमाणेच महिलांच्या, वृद्धांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि तरुण बेरोजगारांच्या योजनाही वंचितच राहिल्याचा निषेध या निवेदनात आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या मोर्चात युवासेनेचे जिल्हा प्रमुख यश खराटे, जिल्हा संघटक दयाल गिरी, युवासेना तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड, माहूरचे माजी नगरसेवक बालाजी वाघमारे, अभिषेक जयस्वाल, युवासेनेचे माहूर तालुका प्रमुख विनोद भारती, महिला आघाडीच्या किनवट तालुका अध्यक्ष, मंगल टोकलवार, माहूर तालुका प्रमुख प्रमुख सुरेखा तळणकर, अन्वर चव्हाण, माहूर माजी सभापती नामदेवराव कातले, सरपंच सुशील जाधव, प्रमोद जाधव, बजरंग वाडगुरे, अरूण दिवसे, साई रुद्रावार यांच्यासह युवासेना, महिला आघाडी व ग्रामपातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.