Announcement of free textbooks for all students, but only 70 percent of textbooks are available
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
उन्हाळी सुट्या संपल्यानंतर १६ जून रोजी रोजी नांदेड जिल्ह्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभहोणार असून, पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची घो-षणा करण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात ७० टक्केच पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित पुस्तके मिळविण्यासाठी शिक्षण विभागातील एकाला खास दूत म्हणून रविवारी पुण्याला पाठविण्यात आले.
विदर्भ वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यातील शैक्षणिक वर्षाला १६ जूनपासून प्रारंभ होत आहे. शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश यापूर्वीच निर्गमित केलेले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात विद्याथ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, बूट, सॉक्स व गणवेश देण्याची घोषणा केली होती. सन २०२४-२५ रोजी या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तके वितरित झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा याबाबत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते.
दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी गतवर्षी पाठ्यपुस्तकासोबतच जोडून कोरी पाने देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या विकत घेऊन ते बाळगण्याचे संकट काही अंशी टळले असले तरी, राज्य शासनाचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
सीबीएसईच्या धर्तीवर पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आगामी काळात टप्प्याटप्याने सर्व विद्यार्थ्यांना याच धर्तीवर अभ्यासक्रम देण्याचा शासनाचा मानस आहे. नांदेड जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी अशा तीन हजार ७०४ शाळा आहे. त्यापैकी जिल्हा परीषदेच्या २ हजार १८५ शाळा आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व अन्य साहित्य देण्यासंदर्भात गेल्या चार महिन्यांपासून तयारी सुरू असली तरी, ती पूर्णतः यशस्वी झालेली नाही.
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ८० हजार २०३ आहे तर सहावी ते सातवीतील विद्यार्थ्यांची संख्या एक लाख १४ हजार २३६ इतकी आहे. शिक्षण विभागाने ही संपूर्ण आकडेवारी चार महिन्यांपूर्वीच वरिष्ठ कार्यालयाला पाठवून पुस्तकांची मागणी केली. पण, शंभर टक्के पुस्तके उपलब्ध झालीच नाहीत, असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील जेमतेम ७० टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळतील. तर दिव्यांग २५७ विद्यार्थ्यांना ठळक अक्षरातील पुस्तकांचे वितरण होणार आहे. शिल्लक पुस्तके मिळविण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी खास दूत म्हणून काहींना रविवारी पुण्याला पाठविले आहे.
माधव सलगर, शिक्षणाधिकारी, नांदेडपुस्तके काही प्रमाणात कमी आले आहेत. ही वास्तविकता आहे. शाळा सुरू होण्यासाठी अजून सहा-सात दिवसांचा कालावधी आहे. पूर्ण पुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिल्लक पुस्तके मिळविण्यासाठी आमचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.