After the appeal, 45 MW of solar energy was generated in Nanded zone
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक घरमालकांनी आपापल्या घरावर सोलर पॅनल बसवून आपल्यापुरती वीजनिर्मिती सुरू केली आहे. नांदेड परिमंडळात ही संख्या ११ हजार २७९ असून ४५.०३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.
राज्य व केंद्र सरकारने आनलाईन कामकाजावर भर दिला आहे. याशिवाय खासगी स्तरावरसुद्धा असंख्य युवक-युवती ऑनलाईन पद्धतीने रोजगार कमावतात. देशविदेशात सेवा देतात. परंतु, त्यासाठी लागणारी सर्व उपकरणे ही विजेशिवाय चालू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने समांतर यंत्रणा उभी करण्यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे ठरविले. त्याचा बऱ्यापैकी प्रसार झाला असला तरी, अजूनही या माध्यमातून वीजनिर्मितीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रचंड संधी शिल्लक आहे.
नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या नांदेड परिमंडळात प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ११ हजार २७६ घरांवर ४५.०३ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जाते. याशिवाय शेतीसाठी स्वतंत्र योजना असून त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नांदेड परिमंडळात नांदेडसह हिंगोली व परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ५ हजार २२० घरांवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले असून त्या माध्यमातून २२.७१ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. परभणीत ४ हजार २०६ घरांवर १५.४४ मेगावॅट तर हिंगोलीत १८५० घरांवर ६.८८ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी गावे मॉडेल सोलार व्हिलेज म्हणून निवडण्यात आलेली आहेत.
सौर यंत्रणा धारकांना शून्य वीजबिल
काही ग्राहकांनी मागील दोन वर्षांपूर्वीच अशी यंत्रणा बसविली आहे. ज्यांनी ही यंत्रणा बसविली त्यांना शून्य वीजबिल येत असल्याने आकर्षण वाढत आहे. एक किलोवॅटच्या सौर वीज निर्मिती प्रकर्पातून महिला १२० युनिट, २ किलोवॅटच्या प्रकल्पातून प्रतिमाह २४० तर ३ किलोवॅटच्या प्रकल्पातून ३६० युनिट वीज निर्मिती होऊ शकते. ही योजना ३० हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदानावर आधारित आहे.