A victim of illegal transportation in Mudkhed, police crack down on illegal transporters.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड येथे अवैध वाहतुकीचा बळी गेल्यानंतर पोलिसांनी अवैध वाहतूकदारांच्या मुसक्या आवडण्यास सुरुवात केली असून बोंढारे येथे नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत लोहा काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर अरुण दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मालकीचा एमएच २६, बीडी ४१०० नंबरचा हायवा आणि त्यातील चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुदखेड येथे एका हायवाने संतोष टाक या नागरिकास चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नांदेड येथेच असणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध वाळू वाहतूकीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केल्या होत्या.
आता ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत बोंढार परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एमएच २६, बीडी ४१०० या या नंबरचा हायवा आणि त्यातील चार ब्रास वाळू जप्त करत हायवा मालक मधुकर अरुण दिघे (वय ४०) व चालक माधव गिरी (वय ३७) यांच्या विरुद्ध भा. दं. सं. कलम ३०३ (२), व ३ (५) तसेच जमीन महसूल अधिनियम, कलम ४८ (७) व (८) प्रमाणे गुन्हा दाखल करत ४० लक्ष २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या सुसाट टिप्पर आणि हायवाने अनेकांचा बळी घेतला आहे. यातच एका राजकीय व्यक्तीचा अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा हाताला लागल्याने ही कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पो. हे. कॉ. समीर अहमद, पो. कॉ. शेख असिफ, केंद्रे व धम्मपाल कांबळे इत्यादीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.