A major scam of Rs 1.09 crore unearthed at the bank of MSRTC employees; the incident took place in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या घामाचा पैसा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'एसटी को-ऑपरेटिव्ह बँके'तच सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नांदेड शहरातील वर्कशॉप कॉर्नर येथील शाखेत तब्बल १ कोटी ९ लाख १४ हजार ५२१ रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बँक व्यवस्थापक, ८ कर्मचारी आणि ३४ सभासदांनी संगनमताने बँकेला चुना लावला असून, याप्रकरणी ४२ जणांवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २७) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे, यासाठी एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. नांदेडच्या वर्कशॉप कॉर्नर येथे या बँकेची शाखा आहे. यवतमाळ (पुसद) येथील बँकेचे निरीक्षक सतीश सर्जे यांच्याकडे नांदेडसह आठ शाखांच्या लेखापरी-क्षणाची जबाबदारी होती. त्यांनी नांदेड शाखेचे ऑडिट केले असता, ११ फेब्रुवारी २०२५ ते २० डिसेंबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत व्यवहारात मोठी तफावत आढळून आली.
बँकेचे व्यवस्थापक बालाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ३४ सभासदांच्या नावे बनावट व्हाऊचर तयार केले. त्यावर विविध रकमा लिहून आणि कर्ज मंजुरीचे खोटे दस्तावेज तयार करून कोट्यवधी रुपयांची रोकड परस्पर उचलली. विशेष म्हणजे, बडतर्फ असलेला सभासद भूषण जोंधळे याच्या खात्यावरही नियमबाह्यपणे १० लाख रुपये जमा करून ते हडप करण्यात आले. मुंबई मुख्य कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक अजिंक्य घुले, कोल्हापूरचे निरीक्षक राहुल पुजारी, परभणीचे मंगेश चौदंते आणि खामगावचे विजय बुंदीले यांच्या पथकाने सखोल तपासणी केली असता, हा १ कोटी ९ लाखांचा अपहार उघड झाला.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
निरीक्षक सतीश सर्जे यांच्या फिर्यादीवरून बँक व्यवस्थापक व कर्मचारी: बालाजी शिंदे, सुभाष पाटील, भाग्यश्री बने, संजय गुंडले, सचिन केळकर, प्रियंका मोरे, प्रविण बेल्लाळे, सुप्रिया नरवाडे (एकूण ८) आणि सभासदः जे. बी. सरदार, के. जी. भिरंकर, एस. एम. पिल्लवन यांच्यासह एकूण ३४ सभासद अशा ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार माळी करत आहेत.
एसएमएस बंद करून लपवले पाप!
या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. सभासदांना कर्ज उचलण्याचा अधिकार १२ लाखांचा असताना, त्यांच्या नावे त्यापेक्षा अधिक रक्कम उचलण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पैसे खात्यातून काढल्यानंतर सभासदाला जाणारा मोबाईल एसएमएस जाणीवपूर्वक बंद करण्यात आला होता, जेणेकरून हा प्रकार कोणाला कळू नये. मात्र, ऑडिटमध्ये हे पाप उघड झाले असून, आणखी काही 'बडे मासे' गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.