34 percent less rainfall compared to last year
नांदेड, पुढारी वृत्तसेवा प्रचंड उकाड्याने लोक त्रस्त असताना आणि दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पिकांना नितांत गरज असताना बुधवारची सकाळ जोरदार पाऊस घेऊन आली. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना आल्हाददायक वाटले. श्रावणात घननिळा बरसला हे गीत सार्थ वाटले. दरम्यान, हा पाऊस सर्वदूर सारखा झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३४.३५ टक्के पाऊस कमी झाला आहे.
यावर्षी पावसाचा लहरीपणा तुलनेने अधिक आहे. लाक्षणिक अर्थाने पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अद्याप केवळ ३९.२५ टक्के पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात सतत व जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं सगळी भरली आहेत. विदर्भाच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला; परंतु मराठवाड्याची स्थिती मात्र तुलनेने नाजूक आहे. नियोजनपूर्वक वापर केल्यास जलसाठ्यात वर्षभर पाणी पुरेल अशी स्थिती आहे; परंतु भूजलस्तराची स्थिती मात्र खूप नाजूक आहे.
या हंगामात लक्षणिय किंवा फायदेशीर पाऊस मोजकेच झाले. त्यात २४ तासात ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस एकदाच दि. २५ जून रोजी झाला. तब्बल ३९ मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर २५ जुलै रोजी २५.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. २३ जुलै रोजी २०.४० मि.मी. पाऊस झाला. परंतु हिमायतनगर व माहूर परिसरातील ४ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. २६ जुलै रोजी ३९.७० मि.मी. पाऊस झाला. १७ मंडळात अतिवृष्टी झाली. अर्थात २५ जून नंतर मोठा पाऊस सर्वदूर झालेला नाही.
नांदेड जिल्ह्याची वार्षिक सरासरी १० वर्षापूर्वी ९५५ मि.मी. होती. सध्या ती ८९१.३० मि.मी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार दि. १ जून पासून आजपर्यंत ४३९.६० मि.मी पाऊस पडणे अपेक्षि होते. परंतु प्रत्यक्षात ३४९.८० मि.मी पाऊस पडला. या तुलनेत ७९.५७ मि.मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३९. २५ टक्के पावसाची नोंद झाली. २ ऑगस्टला सूर्यान आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला असून त्यानंतर बुधवारी प्रथमच पाऊस झाला.
दरम्यान, २९ जुलै नंतर ६ ऑगस्ट रोजी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लोकांसह पिकांना दिलासा मिळाला. मागील आठ दिवसांपासून प्रचंड उकाड्याने लोक हैराण होते. परिणामी विजेचा वापरसुद्धा कमी झालेला नाही. भूजल स्तर चिंताजनक घटतो आहे. यापुढे पावसाचे सातत्य कायम राहावे, अशी अपेक्षा असून पाणी अडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.
जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस (कंसात टक्केवारी)
नांदेड ३७४.००, बिलोली ३२१..७०, मुखेड २३४.२०, कंधार ३०६.७०, लोहा ३१०.३०, हदगाव ३९४.६०, भोकर ३८१.७०, देगलूर २४४.६०, किनवट ५३०.२०, मुदखेड ४५१.६०, हिमायतनगर ४५१.९०, माहूर ४९५.३०, धर्माबाद २७७.९०, उमरी ३३५.५०, अर्धापूर ३७७.९०, नायगाव २४८.२०