

Nanded Heavy Rain city old area water logging
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहराचा जुना भाग असलेल्या जुना गंज येथे मन्सुरखान हवेली चौकाच्या चारही रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. पाऊस पडला की त्यात पाणी साचून त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकासह पादचाऱ्यांचीही कसरत होत असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते आहे. दरम्यान, गणेश चतुर्थी पूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी साईनाथ यादव यांनी मनपाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
जुना गंज- मन्सुरखान हवेली चौरस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असून वाहनचालक जखमी होत आहेत. खड्यामुळे नागरिकही पडत असून जखमी होत आहेत. याची दखल घेऊन या भागातील खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे.
या भागात सिमेंट रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले नाही. या भागातील नाल्यांची सफाई गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आली नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.