

Heavy Rainfall in Nanded City Traffic Disrupted
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सुमारे १० दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी (दि. ६) सकाळी दोन तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे नांदेड शहरातील विविध भागात लोकांची त्रैधातिरपीट उडाली. जवळपास अर्धा ते एक फुटापर्यंत पाणी जमल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळी ११ नंतर मात्र प्रचंड उकाड्याने लोक हैराण झाले.
शहराच्या मोर चौक ते फरांदे पार्क, तरोडा नाका ते गजानन महाराज मंदिर या प्रमुख रस्त्यांसह विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्धवट अवस्थेतील संथ कामामुळे वाहतुकीचा अगोदरच बोजवारा उडाला असून त्यात पावसाने अधिक भर घातली. अर्धवट झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर किरकोळ विक्रेते व वाहनाच्या पार्किंगने मोठी जागा अडवल्यामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत.
बुधवारी सकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी कोचिंग क्लासेस व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची धांदल उडाली. स्कूल व्हॅन व बस रस्त्यात अडकल्या. सुमारे साडेनऊ ते दहाच्या सुमारास नोकरदार मंडळी आफीसला पोहोचण्याच्या गडबडीत वाहतूक कोंडीत अडकून पडले. अचानक जोरदार झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. १० नंतर मात्र चक्क ऊन पडले. त्यानंतर उकाड्याने लोक हैराण झाले.
र्धा पावसाळा झाला तरीही कोणत्याही तालुक्यात जेमतेम ५० टक्क्यांसुद्धा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भूजलस्तराची चिंता आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा या योजनेत शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु पाणी काही अडत नाही व जिरतही नाही. लघुपाटबंधारे याची सुद्धा अवस्था वेगळी नाही.