अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार pudhari photo
लातूर

Women protest illegal alcohol : अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

बेलकुंड : आशिव (ता. औसा) येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आशिव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून 18 मार्च 2026 पर्यंत संबंधित अवैध धंदे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष रितेश रमेश वळके, उपाध्यक्ष किरण विठ्ठल वळके आणि सचिव रमेश विठ्ठल वळके यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आशिव गाव व परिसरात काही ठिकाणी अवैध दारूची विक्री व इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे गावातील महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सामाजिक वातावरण बिघडत आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीही गंभीर होत चालल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार नोंदवून संबंधित अवैध विक्री केंद्रे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, शनिवारी आशिव येथे मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र येत दारूबंदीच्या समर्थनार्थ फलक झळकावत निषेध व्यक्त केला. त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राज्य उत्पादन शुल्क विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यापूर्वीही दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काही दिवसांसाठी अवैध दारूविक्री बंद झाली.

मात्र नंतर ती पुन्हा सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अवैध दारूमुळे अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत असून महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण झाले आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांकडून कारवाईची मागणी होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यावेळी पल्लवी सुरवसे, सुजाता सुरवसे, वनिता कांबळे, शोभा कांबळे, वंदना कांबळे, जिजाबाई कांबळे, कमल रसाळ, सुरेखा ऐवळे, लक्ष्मी बनसोडे, अंजना शिंदे, लक्ष्मी शहाणे, कमल चंद्र, बरकाबाई गायकवाड, शारदाबाई थोरात, सुमन कांबळे आदी महिला उपस्थित होत्या. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT