Where is the campaign to radiumize vehicles transporting sugarcane?
जयपाल ठाकुर
औसा: रात्रीच्या वेळी अपघात होऊ नये म्हणून पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनांना रेडियम स्टिकर लावण्याची मोहीम घेतली जाते; पण सध्या ही मोहीम कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. वाहनांना रेडियम नसल्यामुळे तर रात्री-बेरात्री अपघात होऊ लागले आहेत. ऊस वाहतूक वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही मोहीम राबविणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. त्यासाठी ऊस भरून हजारो वाहने साखर कारखान्यांकडे धावत आहेत.
औसा तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत तर भाऊसाहेब बिराजदार कारखाना, नागराळ, मांजरा साखर चिंचोलीराव, विठ्ठल साई, मुरूम, लोकमंगल, लोहारा या कारखान्यांना पण औसा तालुक्यातील ऊस जातो. असून, अनेक वाहनांतून ऊस वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक दिवसा तसेच रात्रीच्यावेळी वाहतूक करण्यात येत आहे.
मात्र, रात्रीच्या सुमारास होणारी उसाची वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. कारण, अनेक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नाही; त्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून जाऊन वाहने धडकत आहेत. परिणामी छोटे-मोठे अपघातात घडून येत आहेत. रिफ्लेक्टर किंवा रेडियम वाहनांना पाठीमागील बाजूस, अॅक्सलला लावल्यास मागील वाहनधारकांना पुढील अंदाज येऊ शकतो; पण अनेक ऊस वाहतूक वाहनांना रेडियम किंवा रिफ्लेक्टर लावलेले दिसत नाहीत. परिणामी, छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत.
नागपूर- रत्नागिरी महामार्गावर औसा शहराच्या आसपास तुळजापूर रोडवर रस्त्याच्या कडेला व उड्डाणपुलाजवळ अवजड वाहने उभी राहत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. परिसरातील साखर कारखाना सुरू असल्याने औसा किल्लारी, औसा-लातूर, औसा-तुळजापूर व औसा मुरूम या मार्गावर दिवस-रात्र उसाचे ट्रॅक्टर, ट्रकसह अवजड वाहनांची वर्दळ असते. काही वाहने महामार्गावर रस्त्याच्या बाजूस बेशिस्तपणे उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे आरटीओ, वाहतूक पोलिस विभाग व स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वाहनचालकांकडून नियम पायदळी
दोन ते तीन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक, एकच ट्रॉली लावण्याची परवानगी दोन ते तीन ट्रॉली जोडणे, अनेक चालकांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना नसतो, काही वाहनांवर तर चक्क अल्पवयीन चालक, रात्रीच्या वेळी ही वाहने रस्त्याच्या मध्येच उभी करतात, लोकवस्तीतून जाताना कर्ण-कर्कश आवाजात गाणे वाजवणे.