जावेद शेख
उदगीर : दुष्काळाच्या झळा सोसत सावकाराकडून कर्ज काढून घराचे स्वप्न पूर्ण केले; मात्र शासनाने जाहीर केलेला घरकुलचा वाढीव हप्ता अजूनही खात्यात जमा न झाल्याने उदगीर तालुक्यातील गोरगरीब लाभार्थी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. तालुक्यात ११०९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना केवळ ८७ लाभार्थ्यांनाच वाढीव हप्ता मिळाला आहे. उर्वरित लाभार्थी हप्त्याच्या प्रतीक्षेत असून, ‘जगायचे की कर्ज फेडायचे?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाढीव हप्ता देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात हा हप्ता अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. ‘सिस्टीममध्ये नाव दिसत नाही’, ‘तांत्रिक अडचण आहे’ अशी कारणे सांगितली जात असल्याने लाभार्थ्यांचा संताप वाढत आहे.दुष्काळी परिस्थितीतही घराचे बांधकाम अर्धवट राहू नये म्हणून अनेक लाभार्थ्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. घर पूर्ण झाले, मात्र वाढीव हप्ता मिळत नसल्याने आता कर्जाचा व्याजाचा बोजा वाढत आहे.
हप्त्याच्या माहितीसाठी अनेक गावांतील लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, समाधान-कारक माहिती मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. घर पूर्ण करूनही हक्काचा वाढीव हप्ता रखडल्याने गोरगरीब लाभार्थी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव हप्ता तातडीने जमा करावा, अशी मागणी घरकुलधारकांतून होत आहे.
‘साहेबांशी बोला’ म्हणत टोलवाटोलवी?
वाढीव हप्त्याबाबत विचारणा केली असता, ‘जिल्हा परिषदेच्या पीडी साहेबांशी बोला’ असे सांगून लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर पाठविले जात असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हक्काच्या हप्त्यासाठी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत लाभार्थ्यांची फरपट सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक (पीडी) इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी दूरध्वनी घेतला नाही.