Jalna water theft : पाणीचोरी विरोधात सिरसवाडी, दरेगावचे नागरिक आक्रमक

दुष्काळात सर्रासपणे पाणी उपसा; कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Jalna water theft
जालनाः जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सिरसवाडी, दरेगावचे नागरिक आणि दुसऱ्या छायाचित्रात गाढवाच्या गळ्यात साहेब, आमच्यासाठी तरी पाणी ठेवा, असे फलक लावण्यात आले. pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना: सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे दुष्टचक्र ओढावले आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. दुष्काळात एमआयडीसीतील कंपन्या आणि पाणीमाफियांकडून कुंभेफळ, सिरसवाडी व दरेगाव शिवारातील पाझर तलाव, साठवण तलाव, विहिरी, बोरवेल, ओढ्या- नाल्यांमधून बेकायदेशीर पाणी उपसा सर्रास सुरू आहे. पाणीचोरी करणाऱ्या या पाणीमाफियाविरोधात तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सिरसवाडी, दरेगाव, कुंबेफळच्या नागरिकांनी केली आहे.

बेसुमार पाणीचोरीमुळे परिसरात कृत्रिम व तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरी आणि जनावरांचे पाणवठे पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण व महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याने, संतप्त ग्रामस्थांनी बुधवार,दि. ७ रोजी गाढवाच्या गळ्यात मागण्यांचे फलक लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

Jalna water theft
Jalna groundwater level : पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजलपातळी ३.६९ मीटरने घटली

पाणी उपशामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या विहिरी आटल्या असून उभी पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे गोठ्यातील गाई, बैल, म्हशी, शेळ्या-बकऱ्या आणि कोंबड्या पाण्याअभावी तडफडून मरणाच्या दारात उभ्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयाला दोन वेळा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना सरपंच सुमित्रा रवींद्र ढगे, माजी सरपंच कालिंदा ढगे, वंदना वाहूळकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ढगे, ॲड. अशोक वाहूळकर, ॲड. योगेश गाडगे, सुशिला वाहूळकर, सिंधू ढगे आदींसह सिरसवाडी, दरेगाव, कुंबेफळ येथील महिला, पुरुष उपस्थित होते.

Jalna water theft
Sambhajinagar corporator disqualification hearing : नगरसेवक अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर

महावितरणच्या आशीर्वादाने पाईपलाईनचे जाळे?

कुंभेफळ साठवण तलाव आणि दरेगाव लघुसिंचन तलावाच्या लगत एमआयडीसीतील कंपन्या व काहींनी मोठमोठी डिझेल इंजिने आणि हाय-पावर इलेक्ट्रिक मोटारी लावून दिवस-रात्र पाणी उपसण्याचा सपाटा लावला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने 'सिंगल फ्युज डीपी' देऊन या अवैध उपशाला उघडपणे खतपाणी घातले जात असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवारात अक्षरशः बेकायदेशीर पाईपलाईनचे जाळे विणून पाण्याचा थेंब अन् थेंब उपसून नेला जात आहे.

पथक पाठवून पडताळणी होईल- दरेगाव, कुंबेफळ शिवारातील पाझर तलाव आणि साठवण तलावासह कुपनलिकेच्या माध्यमातून जर पाण्याचा व्यावसायिक कारणांसाठी उपसा केला जात असेल तर पथक पाठवून अगोदर पाहणी करण्यात येईल. त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल.

आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news