Latur crime pudhari photo
लातूर

Latur Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

उदगीर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; १५ हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

उदगीर :दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नितेश राजेश राठोड (वय २०, रा. हिवरा, ता. मानोरा, जि. वाशीम) याला उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक एकने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एल. जी. पाच्छे यांनी २१ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला. आरोपीला एकूण १५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला.

ही घटना १७ मार्च २०२५ रोजी वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. परीक्षा संपल्यानंतरही ती घरी परतली नाही. नातेवाइकांनी शोध घेऊनही ती सापडली नसल्याने वाढवणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये १० वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, तसेच कलम ८ अन्वये तीन वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. कलवले यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी खटल्यावर लक्ष ठेवूनमार्गदर्शन केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. चव्हाण यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT