Water Supply Pudhari
लातूर

Latur News : दोन वर्षे उलटली; चाकूरच्या ७५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला गती मिळेना

कंत्राटदाराने उचलली ३८ कोटींची देयके; काम ६५ टक्क्यांवर, चाकूरकरांना 'पाणी मिळणार कधी?'

पुढारी वृत्तसेवा

Two years passed; Chachur's 75 crore water supply scheme did not gain momentum

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : चाकूर शहराचा पुढील पन्नास वर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ७५ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला दोन वर्षे उलटूनही अपेक्षित गती मिळालेली नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत कंत्राटदाराने ३८ कोटी रुपयांची चालू देयके उचलली असताना योजनेचे काम सुमारे ६५ टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही चाकूरकरांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सध्या चाकूर शहराला बोथी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना कालबाह्य झाल्याने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. १५ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर २२ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या कंपनीला कार्यादेश देण्यात आला. दीड वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपल्यानंतर कंत्राटदाराने शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

सध्या पाण्याच्या टाक्यांचे सुमारे ६० टक्के, जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरचे ७० टक्के आणि शहरातील सुमारे ६० किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. घरणी तलावावरील जॅकवेलचे काम सुरू असून तलावात पाणी असल्याने हे काम वेळेत पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता आहे. चाकूर ते धामणगावदरम्यान १८ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील क्रॉसिंगचे काम अद्याप सुरू झालेले नाही. धामणगाव येथे जॅकवेलकडे जाणाऱ्या रस्त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे.

भाटसांगवी येथेही पाईपलाईनच्या कामात अडथळे येत आहेत. या अडचणींमुळे काम आणखी लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तहसील परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेले पाणी नवीन सहा आणि जुन्या दोन टाक्यांद्वारे शहराला पुरविले जाणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर दररोज ७५ लाख लिटर पाणीपुरवठा अपेक्षित आहे. मात्र, कामाची संथगती पाहता योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार, याकडे चाकूरकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने केवळ मुदतवाढ न देता कंत्राटदाराकडून कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा योजनेचे काम सुमारे ६५ टक्के पूर्ण झाले आहे. धामणगाव येथे तलावावरील जॅकवेलचे काम सुरू आहे. जॅकवेलकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविला असून भाटसांगवी येथेही पाईपलाईनच्या कामासाठी अडचणी येत आहेत. संबंधित समस्या दूर करून कामाला गती देण्यात येईल. डिसेंबर २०२६ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रतीक लंबे, मुख्याधिकारी, नगरपंचायत चाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT