भटक्या कुत्र्यांची माहिती द्या! (Pudhari File Photo)
लातूर

रेणापुरात भटक्या कुत्र्यांची संख्या उदंड

उपद्रवामुळे नागरिक त्रस्त; बंदोबस्त कधी होणार ?

पुढारी वृत्तसेवा

The number of stray dogs is high in Renapur

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या उदंड झाली असून ती सुमारे शेकडोंच्या घरात असल्याचे दिसून येत आहे. या कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात जवळपास ६६३ वाटसरूंना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सुप्रीम कोर्टाने राज्याचे सचिव व प्रशासाला कडक निर्बंध घातले असतानाही रेणापूरच्या नगर पंचायतीने मात्र अशा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अद्याप उपाय योजना केली नाही हे विशेष.

आजही गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचा सर्रास वावर वाढला असून लोकांत भीती निर्माणझाली आहे. त्वच ारोगाने त्रस्त झालेल्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे व त्यांच्या संपर्कामुळे सर्वसामान्यांबरोबरच लहान मुलांना खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. मासे व मटनाची दुकाने आहेत तेथे अशा कुत्र्यांचा अधिक वावर दिसून येत आहे.

यासोबतच अन्य मार्केट, गृह संकुल, पदपथरस्ते, शाळा, शासकीय रुग्णालये, इतर कार्यालये व सार्वजनिक ठिकाणीही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भटक्या कुत्र्यांमध्ये बहुतांश कुत्री ही हिंसक स्वरूपाची असतात. त्यामुळे रात्री व दिवसा रस्त्यावरून फिरणाऱ्या व मोटारसायकल किंवा अन्य वाहनांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर थेट धावत येतात व त्यांच्यावर बेधडक हल्ला करतात विशेष करून अशा कुत्र्यांच्या चाव्याला लहान मुले व वृद्ध व्यक्ती अधिक बळी पडत आहेत.

तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी रेणापूरच्या नगर पंचायतीने अशा कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची भटक्या, मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मरतुकड्या व अस्वच्छ कुत्र्यांना होणारी खरूज (स्कॅबीज), नायटा (रिंगवर्म) यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्वचा रोगाला बळी पडावे लागत आहे.

त्यामुळे तीव्र खाज सुटणे, पुरळ येणे किंवा जखमा होऊन सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. विशेष करून लहान मुलांना व वृद्धांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. ज्या ठिकाणी खरजुल्या कुत्र्यांचा वावर असतो अशा ठिकाणी शक्यतो बसणे टाळावे, भटक्या कुत्र्यांच्या त्वचारोगामुळे पाळीव कुत्र्यानाही आजार होऊ शकतो. पिसाळलेल्या, अस्वच्छ व केस गळालेल्या कुत्र्यांपासून दुर राहवे त्यांना स्पर्श करू नये. असा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायणराव देशमुख यांनी दिला आहे.

जानेवारी २०२५ - ५२, फेब्रुवारी - ६२, मार्च - ५६, एप्रिल- ४९, मे५८, जून-५२, जुलै - ६२, ऑगस्ट ४५, सप्टेंबर ५२, ऑक्टोवर - ४३, नोव्हेंबर - ७१ तर डिसेंबरमध्ये ६१ अशा एकूण ६६३ व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
-डॉ. अनिता अलगुले, अधीक्षिका ग्रामीण रुग्णालय रेणापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT