Latur news | चाकूर तालुक्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी राजमा पिकाला अधिक पसंती

वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याऐवजी राजमा पिकाची निवड करत आहेत
Latur news | चाकूर तालुक्यात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले: शेतकऱ्यांची हरभऱ्याऐवजी राजमा पिकाला अधिक पसंती
Published on
Updated on

संग्राम वाघमारे

चाकूर : तालुक्यात विविध भागात राजमा पिकाचे क्षेत्र वाढले असून हरभऱ्यास पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा राजमा पिक घेण्याकडे अधिक पसंती वाढलेली दिसून येत आहे. चाकूर तालुक्यातील रोहिणा, कबनसांगवी, कुंभेवाडी, बावलगाव, आटोळा, उजळंब, बोळेगाव आदी भागात रब्बी हंगामात पारंपरिक हरभरा पिकाला पर्याय म्हणून राजमा पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी अधिक भर दिलेला पाहायला मिळत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याऐवजी राजमा पिकाची निवड करत आहेत.

रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारी ही पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र, हरभरा पिकासाठी लागणारी मेहनत, फवारणीचा खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे खर्चापेक्षा उत्पन्न कमी राहण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याउलट राजमा पिकाला हरभऱ्या इतकीच मेहनत घेतली असता तुलनेने अधिक उत्पादन आणि समाधानकारक बाजारभाव राजमाला मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजारात राजमाच्या विविध जाती उपलब्ध असल्या तरी या भागात 'वाघ्या' आणि 'वरुण' या दोन जातींची लागवड प्रामुख्याने करताना दिसत आहेत. वाघ्या जातीचे उत्पादन तुलनेने कमी येते, मात्र बाजारभाव चांगला मिळतो. तर वरुण जातीचे उत्पादन अधिक असले तरी त्याला तुलनेने कमी दर मिळतो. राजमा पिकाचा कालावधी सुमारे ७५ ते ९० दिवसांचा आहे. एकरी नांगरणी, पाळी, पेरणी, खत, बियाणे, दोन ते तीन फवारण्या, कापणी व मळणी असा एकूण १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यातून सरासरी १० ते १४ कट्टे उतारा मिळतो. परंतु सात ते दहा क्विंटल उत्पादन झाल्यास बाजारभाव ७ हजार ते साडे ९ हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी पुढारीशी बोलताना दिली.

तीन एकरांत ७५ कट्टे उत्पादन

कुंभेवाडी येथील शेतकरी बालाजी पोसाने यांनी तीन एकर क्षेत्रावर ७५ कट्टे उत्पादन घेतले. तर कबनसांगवी येथील जनार्दन सूर्यवंशी यांनी ३० गुंठ्यांत ८ कट्टे आणि ४५ किलो बियाणे वापरून १४ कट्टे उत्पादन घेतल्याचे कुंभेवाडीचे शेतकरी तानाजी लवटे यांनी सांगितले. राजमा पिकातून हरभऱ्याच्या तुलनेने अधिक नफा मिळत असल्याने या परिसरात राजमाच्या क्षेत्रात वाढ होत असून, येत्या काळात चाकूर तालुक्यात या भागाबरोबरच राजमा पिकाचे क्षेत्र आणखीन झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news