Latur News : पोलिसांचा तिसरा डोळा बंद File Photo
लातूर

Latur News : पोलिसांचा तिसरा डोळा बंद

लातूरची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही धूळखात, गुन्हेगारांचे फावतेय

पुढारी वृत्तसेवा

The CCTV cameras in Latur have stopped working due to a technical malfunction

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही देखभालीअभावी पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याला झापड लागल्याने शहराची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे.

२०१७-१८ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे तीन कोटींच्या निधीतून शहरातील १८ ते २० मुख्य चौकांत हाय-डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात आले होते.. सुरुवातीपासूनच या कॅमेऱ्यांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यातच पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे केबल खराब झाल्याने बहुतांश कॅमेरे आता निकामी झाले आहेत. दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ही संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे.

गांधी चौक, मिनी मार्केट, अशोक हॉटेल चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, पाच नंबर चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणचे कॅमेरे बंद आहेत. परिणामी, वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारी घटनांचा तपास करताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत.

कॅमेऱ्यांचा धाक नसल्याने शहरात वाहने सुसाट धावत असून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. प्रशासनाने केवळ कॅमेरे लावून कर्तव्य पार पाडले, मात्र त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले, अशी भावना लातूरकरांमध्ये आहे. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.

सीसीटीव्ही फुटेज नसल्याने तपासात व्यत्यय

लातूर शहरातील प्रमुख चौक व मुख्य बाजारपेठ भागातील कॅमेरे बंद असल्याने चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी जातात, तेव्हा कॅमेरा बंद असल्याचे समोर येते. यामुळे तपासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT