

लातूर : शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावलौकिक मिळवलेले लातूर शहर सध्या एका वेगळ्याच संकटाने ग्रासले आहे. महापालिका आणि सिग्नल कंत्राटदार यांच्यातील थकीत बिलांच्या अर्थकारणामुळे संपूर्ण शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली असून, लातूरची वाहतूक अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना आता पुस्तकाऐवजी वाहतूक कोंडीच्या धड्याचा सामना करावा लागत आहे.
लातूर शहरातील सिग्नल यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ज्या कंत्राटदारावर आहे, त्याची लाखो रुपयांची बिले महानगरपालिकेकडे थकीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन ढिम्म हलत नसल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्णपणे थांबवले आहे. यामुळे शहरातील बहुतांश सिग्नल हे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत.
एकेकाळी वाहतुकीचे नियमन करणारे हे खांब आज केवळ जाहिराती लावण्याच्या शोभेच्या वस्तू बनले आहेत.शहराचे हृदय असलेल्या गांधी चौक व पाच नंबर चौक या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र येथे सिग्नल बंद असल्याने तासनतास कोंडी होत आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा दयानंद कॉलेज परिसर हा भाग सिग्नलअभावी अपघाताचे केंद्र बनत आहे.
औसा रोडवरील राजीव गांधी चौक व खर्डेकर स्टॉप या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले आहे. मिनी मार्केट व गुळ मार्केट व्यापारी पेठ असल्याने येथे अवजड वाहने आणि रिक्षांची कोंडी पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.वाहतूक पोलिसांनी या समस्येबाबत वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे.
नियमन नसल्याने चौकाचौकात वाहनचालकांमध्ये वादावादी आणि हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. आम्ही नियमित कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठी का झुंजावे लागते? महापालिका आणि कंत्राटदाराच्या वादाशी सर्वसामान्यांचे काय देणेघेणे? प्रशासनाने हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा केली जात आहे का? असा सवाल सर्वसामान्य लातूरकर उपस्थित करीत आहेत.
आता महानगरपालिका निवडणूक संपली आहे. पुढच्या महिन्यात महापौर व त्यांचे कार्यकारी मंडळ अस्तित्वात येईल. तेव्हा लातूरची ही विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे, अन्यथा लातूर पॅटर्नची ओळख वाहतूक कोंडीचा पॅटर्न म्हणून व्हायला वेळ लागणार नाही, असेही लातूरकर बोलत आहे.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
लातूर हे राज्यस्तरावरील शैक्षणिक हब आहे. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत शहरातील रस्त्यांवर जणू विद्यार्थ्यांचा पूर लोटतो. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने भरधाव खासगी वाहने, रिक्षा आणि बस यांच्या गर्दीतून रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोंडीमुळे वेळेवर क्लासेस किंवा शाळेत पोहोचता येत नाही, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे.