ओलगे ओलगे सालम पोलगे; 'काळ्या आईचं चांगभलं' File Photo
लातूर

Yelvas festival : ओलगे ओलगे सालम पोलगे; 'काळ्या आईचं चांगभलं'

बळीराजाची येळवस ग्रामीण भागात आजही विशेष

पुढारी वृत्तसेवा

The Baliraja Yelvas festival is still celebrated with special significance in rural areas.

संग्राम वाघमारे

चाकूर : ग्रामीण संस्कृती, निसर्गपूजा आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी नाळ जुळलेला बळीराजाचा सण 'येळवस' (वेळ अमावस्या) आजही ग्रामीण भागात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. "ओलगे ओलगे सालम पोलगे, काळ्या आईचं चांगभलं!" या पारंपरिक उद्रारात शेतकरी वर्गाचा आनंद, कृतज्ञता आणि आशा व्यक्त होताना दिसते.

लातूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागात अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच जिव्हाळ्याने जपली जाते. मार्गशीर्ष अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी शेतकरी बांधव चार दिवस आधीपासूनच तयारीला लागतात.

तुरीच्या, हरभऱ्याच्या, भुईमूगाच्या, वाटाण्याच्या शेंगांचा रानमेवा गोळा करून खास पद्धतीने भजी तयार केली जातात. बेसनाच्या पिठात कालवून, चिंच व आंबवलेल्या ताकाच्या पाण्यावर उकडलेली ही भजी ग्रामीण चवीची खासियत ठरते. येळवस सणाचे आणखी आकर्षण म्हणजे अंबील. चार दिवसांचे ताक ज्व-ारीच्या पिठात अंबवून त्याला जिऱ्याची फोडणी दिलेली अंबील सर्वांच्याच पसंतीस उतरते.

त्या अंबिलावर अनेकजण मनसोक्त ताव मारतात. वाळलेली भाकरी, बाजरीची भाकरी, गव्हाची खीर, दूध, तूप असे पदार्थ घेऊन शेतकरी डोक्यावरून किंवा बैलगाडीतून शेताकडे रवाना होतो. तब्बल ५० ते १०० जण जेवतील एवढा स्वयंपाक शेतात नेला जातो. वेळ अमावस्येच्या दिवशी शेजारील शेतकरी, नातेवाईक, मित्रमंडळींना आमंत्रण दिले जाते. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्याची मजा काही औरच असते. जेवणानंतर अंगातले जडपण जावं म्हणून प्रत्येक कोपीसमोर झोके बांधले जातात. त्या झोक्यांवर महिला, पुरुष, लहान मुले झुलत आनंद लुटतात आणि संपूर्ण शेत आनंदाने गजबजून जाते.

रब्बी पेरणीनंतर, ऐन थंडीच्या काळात येणारी ही वेळ अमावस्या असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेली मंडळीही कुटुंबासह गावी परतून येळवस सण साजरा करतात. दरवर्षी शेतातील काळ्या आईचे पूजन करून निसर्गाचे ऋण फेडण्याची भावना या सणामागे दडलेली आहे.

या दिवशी लक्ष्मीदेवीच्या फोटोचे पूजन, कोपीची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून गावातील थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे शेतात मोठी गर्दी जमते आणि वनभोजनाचा मनमुराद आनंद घेतला जातो. यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकांमध्ये चर शिंपून "ख्बी हंगाम चांगला जावो" अशी देवीकडे मनोभावे प्रार्थना केली जाते.

डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणारी येळवस, हिरव्यागार पिकांनी डोलणाऱ्या शेतांमध्ये अधिकच शोभून दिसते. शेतकऱ्यांच्या जीवनातील हिवाळा हा आनंदाचा ऋतू मानला जातो. या काळात घेतलेला आहार शरीराला पोषक असल्याने बाजरीची भाकरी आणि भजी ही प्रत्येक घरातील खास मेजवानी असते. येळवस सण मोठ्या उत्साहात साजरा करताना बळीराजाचं मन हलकं होतं, शेतात आनंद नांदतो आणि लक्ष्मीचा वास होतो, अशी अख्यायिका आजही ग्रामीण समाजात तितक्याच श्रद्धेने सांगितली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT