शिवाजी गायकवाड
तांदूळजा : लातूर कळंब तसेच मुरुड अंबाजोगाई या मुख्य रस्त्यावरील तांदूळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेडसावणारी अस्ताव्यस्त वाहनांची पार्किंग ही नागरिकांच्या जीवावर उठत आहे. चौकातील वाहनांची गर्दी व रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभे असलेल्या अवजड वाहनामुळे सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तांदूळजाची बाजारपेठ ही पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असल्याने येथे व्यापार,दैनंदिन व्यवहार, शासकीय कार्यालय आणि कामासाठी येथे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने भर चौकामध्ये चार चाकी व अवजड वाहने उभी केली जातात.यामुळे वाहनचालकांना सहज रस्ता पार करणे ही अवघड झाले आहे.
वाहनांच्या मोठ्या गर्दीतून चौकालगत असणाऱ्या वस्तीमध्ये नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे कठीण जाते सदर चौकात वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उडालेला असतो या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांसह वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौका लगत असणाऱ्या गल्लीमध्ये स्थानिक नागरिकांना या उभा करून गेलेल्या वाहनधारकांना अक्षरशः शोधत जाऊन किंवा सदर वाहनावर असलेला त्यांचा नंबर शोधून त्यांना फोन करून बोलवावे लागते व या वाहनधारकांना विनंती करूनच आपले वाहन त्यानंतर आपल्या गल्लीमध्ये नेण्यास जमते.
गेली अनेक वर्षापासून लातूर कळंब या महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गावरील तांदूळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लातूर कळंब या रोडवर डिव्हायडरसाठी जागा रिक्त ठेवलेली असल्यामुळे त्या डिव्हायडरचा फायदा ऊस वाहतूक करणारे तसेच अवजड वाहनधारक आवर्जून करत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच परिसरातून ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर इत्यादी वाहनांना लावण्यात आलेल्या कर्णकर्कश टेप व हॉर्नचा आवाज वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत आहे व रात्री बे रात्री या वाहनावरील लावण्यात आलेल्या टेपचा आवाज नागरिकांच्या झोपेला अडसर बनत आहे.
चारचाकी व अवजड वाहने गल्लीत जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाला उभी केल्यामुळे आम्हाला रोज वाहनमालकांना फोन करून विनंती करावी लागते. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना वाहनांच्या गर्दीतून रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने करूनही दुर्लक्ष होत आहे.दिलीप सुरवसे, नागरिक
गावात आल्यानंतर वाहनांवरील गाण्यांचा आवाज कमी न करता रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. यामुळे आमच्या झोपेला मोठा अडथळा निर्माण होतो.नागरिक