Sugarcane farmers in Nilanga taluka are facing a major crisis as the monsoon has not yet arrived
निलंगा, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने अद्याप हजेरी न लावल्याने निलंगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी अनेक ठिकाणी ऊस पिकाने मान टाकली असून पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास हजारो एकरांवरील ऊस उत्पादनाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा पावसाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने ऊस लागवड केली. मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, त्या शेतांतील ऊस झपाट्याने सुकत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या उसाला पाण्याची नितांत गरज असते.
मात्र उष्णतेची तीव्रता आणि पावसाचा लांबलेला खंड यामुळे ऊस पिकावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना टँकर किंवा विहिरीतील उरलेल्या पाण्यावर पिके जगविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची मागणी केली असून, पाऊस लवकर न झाल्यास ऊस उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन करावे, तसेच संभाव्य नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
आभाळ भरून येत आहे पण पाऊस पडत नाही. त्यामुळे डोळ्यांसमोर ऊस वाळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे.