एसटी थांबत नसल्याने काटगावच्या विद्यार्थ्यांचे हाल pudhari photo
लातूर

Katgaon students transport problem : एसटी थांबत नसल्याने काटगावच्या विद्यार्थ्यांचे हाल

संभाजी सेनेचा एसटी महामंडळाला आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

लातूर : “गाव तिथे एसटी” असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे लातूर तालुक्यातील काटगाव येथील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. सकाळी 9 ते 12 या महत्त्वाच्या वेळेत लातूर-कळंब मार्गावरील बसेस काटगावला थांबत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रश्नी संभाजी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काटगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणानिमित्त लातूर किंवा कळंबकडे प्रवास करतात. ग्रामीण भागातील मुलांसाठी एसटी हेच प्रवासाचे एकमेव आणि हक्काचे साधन आहे. मात्र, सकाळी 9 ते 12 या वेळेत एकही बस या गावाला थांबा देत नाही.

बस समोरून रिकामी जाते, पण थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचता येत नाही. संभाजी सेनेचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कांदे यांच्या नेतृत्वाखाली लातूर विभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

लातूर-कळंब मार्गावरील बसेसना काटगाव येथे नियमित थांबा देण्यात यावा. येत्या आठ दिवसांत ही मागणी मान्य न झाल्यास विभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान होणाऱ्या कोणत्याही परिणामांना सर्वस्वी एसटी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संभाजी सेनेचे विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद पवार, जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, जिल्हा उपाध्यक्ष रितेश चव्हाण, तालुकाध्यक्ष उमाकांत वायाळ, शहर अध्यक्ष वैभव विभुते, तालुकाध्यक्ष निखिल जगताप यांसह अनेक पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT