

लातूर : लातूर महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर स्नेहल उटगे यांनी पदभार स्वीकारताच कामकाजाचा धडाका लावला आहे. गुरुवारी (दि. 12) त्यांनी महापालिकेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. आगामी श्री सिद्धेश्वर यात्रा आणि शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व सोयीसुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मनपा आयुक्त मानसी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रारंभी सर्व विभाग प्रमुखांचा परिचय करून घेण्यात आला. महापौर व उपमहापौरांनी महापालिकेचे दैनंदिन कामकाज समजून घेत पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन आणि पथदिवे अशा महत्त्वाच्या विभागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. येत्या रविवारपासून (दि. 15 फेब्रुवारी) लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा सुरू होत आहे.
या यात्रेच्या नियोजनाबाबत महापौरांनी खालील सूचना केल्या. यात्रेत भाविकांसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे. यात्रा परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि बंद असलेले पथदिवे सुरू करणे. अग्निशमन दलाने 24 तास तत्पर राहणे. यात्रा परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेणे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसराची स्वच्छता, आवश्यक ती डागडुजी आणि सुशोभीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीस गट नेते विजयकुमार साबदे, नगरसेवक धोंडिराम यादव, सचिन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने सर्व आवश्यक बाबींना प्राधान्य द्यावे. सण आणि उत्सवाच्या काळात नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळणे ही आपली जबाबदारी आहे.
जयश्री सोनकांबळे, महापौर, लातूर.