Student dies after being beaten up at freshers' party in Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूरमधील एका नामांकित महाविद्यालयात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या फ्रेशर्स पार्टीदरम्यान मारहाण झालेला विद्यार्थी उपचार सुरु असताना रविवारी मरण पावला. या प्रकारामुळे लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे. सुरज शिंदे असे मृताचे नाव आहे. या खून प्रकरणी ३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
लातूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या बीसीए महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी आयोजीत करण्यात आली होती. या दरम्यान सर्व विद्यार्थी या पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर या महाविद्यालयाशेजारीच रिहान शेख आणि इरफान पठाण (दोघेही रा. चौधरी नगर, लातूर) व त्यांच्यासोबत इतर दोघेजण यांनी विद्यार्थी सुरज धोंडीराम शिंदे (रा. प्रगती नगर, लातूर) यास काठीने मागील भांडणाची कुरापत काढून गंभीररित्या जखमी केलं.
सुरज शिंदे हा कोमात होता त्याचा उपचारादरम्यान लातूरच्या एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये सुरज शिंदे याचा मित्र आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून रिहान शेख आणि इरफान पठाण यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी शिंदे हा मरण - पावल्याने त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा नोंद होईल.