रेणापूर (लातूर) : मागील काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचलेल्या ठिकाणी सोयाबीन पिकात मानकूज आणि मूळकूज या रोगांचा तर काही ठिकाणी सोयाबीनच्या खालच्या भागात आर्द्रता वाढून शेंगावरील करपा, पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगाच्या प्रादुर्भावाबरोबरच खोडमाशी, स्पोडोप्टेरा आणि शेंगा पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव पुढील काळात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वेळीच उपाययोजना करावी असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.
सोयाबीन पीक हे 50 ते 55 दिवसांचे असून सध्या हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. सर्वप्रथम शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करून देण्याची व्यवस्था शेतकर्यांनी करावी .तसेच खाली दिलेल्या कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकापैकी एका बुरशीनाशकाची निवड करून तात्काळ त्याची फवारणी केल्यास किडींचे आणि बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन चांगल्याप्रकारे शेंगात दाना भरण्यास मदत होईल.
फवारणी करताना पायात गमचे शूज वापरावेत त्याबरोबरच नाक आणि तोंड स्वच्छ कापडाने झाकण्याबरोबरच संरक्षणात्मक किटचा वापर करावा, असे आवाहन रेणापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी केले आहे.
कीटकनाशकांसाठी क्लोरॅनट्रिनीलीप्रोल (कोराजन) 18.5 टक्के 03 मिली किंवा पल्यूबेंडामाईड (फेम) 39. 35 टक्के 2.5 मिली किंवा ईमामेक्टीन बेझोएट 1. 9 टक्के 09 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
बुरशीनाशकांसठी टेब्यूकोनॅझोल + सल्फर (स्वाधीन) 20 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब + कार्बेन्डॅझीम (साफ) 20 ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9 टक्के फॉलीक्यूअर 15 ग्रॅम किंवा फ्ल्यूक्झापाय-रॅक्झाइड + पायरॅक्लोस्ट्रॉबीन (प्रायक्झर ) 07 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून याप्रमाणे त्वरीत फवारणी घेण्याची आवश्यकता आहे.
वरील किटकनाशके व बुरशीनाशकाचे प्रमाण चार्जिंगच्या पंपासाठी दुप्पट तर पेट्रोल पंपासाठी तिप्पट करावे. तूर पिकामध्ये जमिनी लवकरात लवकर वापशावर येण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करून देण्याची व्यवस्था करावी आणि पाऊस उघडताच मर रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विद्यापिठाचे जैविक बुरशीनाशक बायोमिक्स किवा ट्रायकोडर्मा प्रति एकरी 04 किलो 250 लिटर पाण्यात मिक्स करून तुरीच्या ओळीच्या बाजूने आळवणी करावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिला आहे