

पूर्णा : तालुक्यातील शेतशिवारात ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे काढणीपश्चात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवर आयसीआयसीआय लोम्बार्ड पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीत मंजुरी देण्यात आली. शासनाने विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी आवश्यक निधीही वर्ग केला आहे.
पीक विमा कंपनीने बाधित क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई रक्कम निश्चित करून ती पोर्टलवर अपडेट केली आहे. विमा पॉलिसी रेकॉर्डनुसार मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई रक्कम अक्सेप्ट स्टेटसपर्यंत सेव्ह करण्यात आली आहे. आता उर्वरित काम म्हणजे ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणे बाकी आहे. मात्र, शासन स्तरावरून अद्याप पेमेंट वर्ग न झाल्याने पात्र शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, “काढणीपश्चात पीक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत नुकतीच बैठक झाली असून, पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच भरपाई जमा केली जाणार आहे. मात्र, नेमकी तारीख निश्चित झालेली नाही. तरीही भरपाई लवकरात लवकर मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी दररोज खात्यात भरपाई जमा होण्याची वाट पाहत असताना, शासनाने यासंदर्भात एक शासन निर्णयही निर्गमित केला आहे. प्रत्यक्षात मात्र भरपाई पेमेंट होल्डवर असल्याचे समजते. त्यामुळे मंजूर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाच्या निर्णयानुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानुसार, काढणीपश्चात नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.