Seven Animals Perish in Barn Fire in Janwal
चाकूर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जानवळ येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून त्या गोठ्यातील सात जनावरे भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शेतकऱ्याचे दहा लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्याप्रती सहानुभूती दाखवीत वैयक्तिक १ लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.
जानवळ येथील शेतकरी ज्ञानोबा भोजने यांचे गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गट नंबर ३५९ मध्ये अडीच एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी जनावरे बांधण्यासाठी व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधला होता. गुरुवारी २३ एप्रिल दुपारी १ वाजून ४० मिनिटाला तळपत्या उन्हात गोट्याला अचानक आग लागून ३ जर्सी गायी, २ वासरे व २ गोरे तसेच २१ कट्टे सोयाबीन, विद्युत वायराचे बंडल, जनावरांचा कडबा व शेतीचे आवजारे जळून खाक झाली आहेत.
यामध्ये एक गोरे जवळपास ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती ज्ञानोबा भोजने यांचा मुलगा शिवशंकर भोजने यांनी दिली. यामध्ये शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली असून भोजने या शेतकऱ्याला वैयक्तिक १ लाख रुपये मदत करून प्रशासनातील अधिकारी यांना सदरील शेतकऱ्याला योजनेच्या माध्यमातून शासनाकडून गोठा व दुधाळ जनावरे देण्यात यावे असे सांगितले.
तालुक्यातील जानवळ शिवारात तळपत्या उन्हात जनावरांच्या गोठ्याला आग लागून सात जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच सोयाबीन, विद्युत वायराचे बंडल व शेतीची आवजारे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना पाहून ज्ञानोबा भोजने या शेतकऱ्याने हंबरडा फोडल्याने वातावरण भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.