Sahdev's 500-kilometer journey on foot for farmers' demands
गोरख भुसाळे
किनगाव : व्यवस्था अन निसर्गाच्या चक्रात अडकलेल्या बळीराजाला न्याय मिळावा. त्याच्या कष्टाचा आदर व्हावा, त्याच्या माथ्यावरील कर्जाचा डोंगर हटावा, मरणाचा विचार त्याच्या मनाला कधीही न शिवावा असे शेतकरी हितैषी धोरण सरकारने राबवावे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात या प्रांजळ उद्देशाने अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे (वय ५०) हे विधानभवनाकडे खांद्यावर नांगर घेऊन पायी निघाले आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता ते अहमदपूर मार्गस्थ झाले.
शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, जगण्याचा अधिकार मिळावा, रोजगार हमी योजना वर्ष २०२३ पासूनची थकीत रक्कम मिळावी, नाफेड अंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी फरक रक्कम मिळावी, शेतकरी सन्मान निधीत वाढ करावी अशा शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून हा शेतकरी मुंबापुरीस निधाला आहे, खांद्यावर नांगर, पाठीवर अंथरूण पांघरून, शिद्या साहित्याची बॅग अन मनात जिद्द घेऊन ते पायी विधानभवन गाठणार आहेत.
दिवसाला ५० किलोमीटर अंतर ते चालणार आहेत या गतीने आपण १० ते ११ दिवसांत विधानभवन गाठू असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. सरकारला अनेक निवेदन दिले. मात्र सरकार दखल घेत नसल्याने आता विधानभवन गाठायचे असा आपण निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी ते केजपर्यंत पोहोचले होते.