Renapur OBC reservation Chhagan Bhujbal
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले. त्याचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका. सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेले आहे. आम्हाला मिळालेले आरक्षण आम्ही टिकविणारच यासाठी आम्ही लोकशाही मार्गान जात आहोत, असे प्रतिपादन ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करून ओबीसीचे आरक्षण संपणार या भीतीपोटी दोन दिवसांपूर्वी वांगदरी येथील तरुण भरत कराड याने मांजरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भुजबळ हे शुक्रवारी (दि. १२) वांगदरी येथे आले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड, नवनाथ वाघमारे, किशोर मोदी यांची उपस्थिती होती.
मंत्री छगन भुजबळ यांनी कराड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. भरत कराड यांचे बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही. मुलाबाळांची काळजी घ्या, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. ओबीसी समाजाने आरक्षण टिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे, लोकशाही मार्गाने आपले आंदोलन सुरू राहील, असे सांगून ओबीसी आरक्षण संपू देणार नाही, असेही ते म्हणाले.
५२ टक्क्यांनी असलेल्या ओबीसीला आता केवळ १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. यात पुन्हा बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण दिले तर मूळ ओबीसींवर मोठा अन्याय होणार आहे. त्यास आम्ही तीव्र विरोध करू. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, त्यासाठी ओबीसींनी आपापले सर्व मतभेद बाजूला सारून एकजूट करावी. ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठीच्या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. आजच्या घडीस महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे. याशिवाय ईडब्ल्यूएसच्या १० टक्के आरक्षणाचा ९० टक्के लाभमराठा समाजाला मिळत आहे.
याशिवाय हे सर्व ओपनमधील लाभही मिळवीत आहेत. असे असताना ओबीसीतून यांना आरक्षण कशासाठी हवे आहे, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर ओबीसीतून आरक्षण पाहिजे तर मग तुम्ही ओपनमधील हक्क सोडणार का? मराठांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाचा हक सोडणार का? ईडब्ल्यूएसमधील हक्क सोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी तरुणांनी बलिदानाचा मार्ग अवलंबू नये. देशात लोकशाही आहे, आपण एकजुटीने लढू या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार रमेश कराड यांनी भरत कराड यांच्या मुलांच्या शिक्षणाची व इतर सर्व जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले.
चिमुकलीचे डोळे पुसले
छगन भुजबळ यांनी भरत कराड यांच्या एका मुलीस मायेने जवळ घेत कवटाळले. मांडीवर बसविले, ती मुलगी रडत असातना आपल्या खिशातून हातरूमाल काढून भुजबळांनी त्या मुलीचे अश्रू पुसले. इतर मुलांच्या डोक्यावरून हात फिरविला.