Renapur theft cases increase : रेणापूर तालुक्यात चोरी, लुटीच्या घटनांमध्ये वाढ Pudhari
लातूर

Latur crime : रेणापूर तालुक्यात लूटमार अन्‌‍ चोरीच्या घटनांत वाढ

एकट्यास लक्ष्य; स्प्रे मारून अन्‌‍ शस्त्रांचा धाक दाखवून दागिने, पैशाची लूट

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर : शेताकडुन घराकडे येत असतांना तोंडावर स्प्रे व फुंकर मारणे तसेच दिवसा ढवळ्या धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेवून पसार होणे तसेच घरफोड्या, जनावरांच्या चोऱ्या यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रेणापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या पूर्वी अशा सात घटना घडल्या होत्या त्यात परत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील भोकरंबा गावच्या एका शेतकऱ्याला चाकुचा धाक दाखवून त्याला दगडाने जबर मारहाण करून त्यांच्याजवळील 55 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाल्याचा प्रकार लातुरात घटला आहे.

वरचेवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे चोरट्यांनी एकट्याला गाठून त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे अंगावर दागिने घालून एकट्या - दुकट्याला सोन्याचे दागिने परिधान करून फिरणे आता जिकिरीचे झाले असून कधी - कधी ते जीवघेणेही ठरत आहे.

यापूर्वी रेणापूर-पानगाव मार्गावर घनसरगाव पाटीजवळ तसेच इतर ठिकाणी मोटारसायकलस्वारांनी शेतकऱ्यांच्या तोंडावर स्प्रे मारून किंवा फुंकर घालून त्यांना गोंधळात टाकत त्यांच्या अंगावरील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांत धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जबरदस्ती लूटमार करण्यात आली आहे.

दरम्यान, तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मोटेगाव, चाडगाव आणि इतर गावांमध्ये घरांतून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीस गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण अकरा तोळे सोने आणि सुमारे दोन लाख 35 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समजते.

तसेच शेतात बांधलेली जनावरे चोरीस जाण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे चोरट्यांनी आता एकट्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अंगावर सोन्याचे दागिने घालून बाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे. काही प्रकरणांत पीडित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करत नसल्याने गुन्हेगारांवर अंकुश येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण आणून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT