Kolhapur ZP Election : गावगाड्यात निवडणूक ज्वर चढला, राजकारण ढवळले

गंडेदोरे-जादूटोण्याचे प्रकार : प्रचारात अडकले कामगार; शेती व उद्योगांवर परिणाम : दुरावलेली मने पुन्हा जुळली
Kolhapur ZP Elections
Kolhapur ZP ElectionsPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा सध्या गावागावांत ज्वर चांगलाच चढला असून राजकीय हालचालींमुळे संपूर्ण ग््राामीण जनजीवन ढवळून निघाले आहे. प्रचारासाठी कामगार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने शेतीची कामे खोळंबली असून छोट्या उद्योगांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यातच गंडेदोरे व जादूटोण्याच्या चर्चांनी काही ठिकाणी वाद आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र एका-एका मतासाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून पूर्वी दुरावलेली माणसे पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र गावपातळीवर दिसून येत आहे.

जेवणावळी आणि पाकिटांचा महापूर

गगनबावडा : अनेक ठिकाणी आदर्श आचारसंहिता केवळ कागदावर उरल्याचे वास्तव आहे. दिवसा प्रचारात विकासाच्या बाता मारणारे सूर्यास्त होताच सक्रिय होत आहेत. शेतातील आखाड्यांवर आणि ढाब्यांवर कार्यकर्त्यांच्या गुप्त पार्ट्या झडत असून यात मटण आणि मद्य याचा वापर केला जात आहे. अनेकांना पाकिटे पोहोचवण्याचे नियोजन उघड गुपित झाले आहे. देवदर्शन घडवून पोळी भाजून घेण्याचा प्रकारही सुरू आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून उशिरापर्यंत लाऊडस्पीकरचा धिंगाणा सुरू आहे. भरारी पथके आणि तपासणी नाके केवळ नावालाच उरले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रचारात आता आपला माणूस

एका मतासाठी सुरू असलेली धावपळ ही प्रचारापुरती मर्यादित न राहता, विसरलेली आपुलकी, तुटलेले संवाद आणि दुरावलेली नाती पुन्हा जोडणारी ठरत आहे.कित्येक वर्षांपासून न भेटलेले नातेवाईक या निमित्ताने पुन्हा घराच्या ओसरीवर येऊन बसत आहेत. कामानिमित्त परगावी गेलेले, शेतात राबणारे तसेच रोजीरोटीसाठी गावाबाहेर स्थायिक झालेले आप्तस्वकीयही गावाकडे परतत आहेत. राजकारणाची चर्चा नंतर होते; आधी तब्येतीची, शेती आणि लेकराबाळांची चौकशी होत आहे. ‌‘आपलाच माणूस‌’ हा शब्द कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काही कुटुंबांत मतभेद असले, तरी नात्यांची दोरी पूर्णपणे तुटलेली नाही, हे निवडणुकीतून स्पष्ट होत आहे. मतदार आता उमेदवाराकडे नेता म्हणून नव्हे, तर अडचणीच्या काळात सोबत राहणारा माणूस म्हणून पाहू लागले आहेत. लढत सत्तेसाठीची न राहता संवेदनशीलतेची बनली असून माणुसकीची आठवण करून देणारीही ठरत आहे.

घरांसमोर, चौकात लिंबू-दोरे; मंदिर, स्मशानभूमीत गुप्त विधी

अनेक भागांत जादूटोणा आणि लिंबू-दोऱ्यांच्या प्रकारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. अनेक ठिकाणी घरांसमोर टाकलेले लिंबू-दोरे, चौकात आढळणारे टोटके, मंदिर व स्मशानाजवळ केलेले गुप्त विधी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा विरोधी उमेदवारांचे राजकीय नुकसान व्हावे यासाठी जाणीवपूर्वक जादूटोण्याचे प्रकार केले जात असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी भीती निर्माण करून किंवा अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न होत असल्यास ते केवळ चुकीचेच नाहीत, तर कायद्यालाही आव्हान देणारे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन, निवडणूक यंत्रणा तसेच सामाजिक संघटनांनी कठोर भूमिका घेऊन अशा घटनांना आळा घालणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news