रेणापूर : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग दिला असून पेरणीची तयारी जोरात सुरु केली आहे. दरम्यान पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला शेतक-यांना देण्यात आला आहे.
मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढली होती अशाही स्थितीत भर उन्हात शेतकऱ्यांनी शेतातील नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती, झाडे-झुडपे काढणे व इतर कामे केली आहेत. मे च्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात थोडासा बदल झाला त्यामुळे शेती कामाला वेग आला आहे थंड, महागामोलाची खते व बियाण्यांची जमवाजमव केली जात आहे.
यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होता परंतु हवामान खात्याने एल निनोचे संकट येणार असे भाकीत केल्याने खरीप हंगामासाठी सज्ज झालेला शेतकरी काहीसा गोंधळला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बैल बारदाना मोडला असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे केली जात आहेत तुरळक ठिकाणी शेती कामासाठी बैलांचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यानी शेतात शेणखत टाकणे, शेतातील दगड-गोटे साफ करणे तसेच पाण्याच्या निचऱ्यासाठी नाले खोदण्याची कामेही हाती घेतली आहेत.
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र, येणाऱ्या हंगामात चांगले उत्पादन मिळेल या अपेक्षेने शेतकरी नव्या जोमाने कामाला लागले आहेत.
दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धतीने मशागत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यात सोयाबीन या प्रमुख पिकांच्या पेरणीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रेणापूर तालुक्यात खतांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना उसणवारी किंवा खाजगी सावकारांवर अवलंबून राहवे लागत आहे.खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.