Prepare for local body elections: MLA Amit Deshmukh
लातूर प्र, पुढारी वृत्तसेवा :
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाचा विचार आपल्या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची तयारी करावी, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.
लातूर येथे आयोजित प्रभाग आणि ग्रामअध्यक्षांच्या नियुक्ती पत्रवितरण सोहळयात आ. देशमुख बोलत होते. खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हाकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, माजी महापौर विक्रांत मुंडे, डॉ. दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, द्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. देशमुख यांनी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ड. किरण जाधव यांनी केलेल्या या संघटनात्मक फेरबदलांचे कौतुक करुन केले महाराष्ट्रात असे संघटनात्मक फेरबदल करणारा लातूर हा कदाचित पहिला जिल्हा असेल असे नमूद केले. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे संदर्भ वेगळे असले तरी काही गोष्टी एकसारख्याच असतात.
त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि विरोधी पक्षांना गेलेली मते याचा बारकाईने अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात करता येईल असेही त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील,
मतभेद बाजूला सारून सर्वांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल, उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करावी लागेल या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट स्थापन करून लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही प्रमुख पदाधिकाऱ्यांना आ. देशमुख यांनी दिल्या आहेत. खासदार डॉ. शिवाजी काळगे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्या उर्जेने आणि उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन केले.