Poor condition of Murud - Ambajogai road
तांदुळजा, पुढारी वृत्तसेवा: लातूर तालुक्यातील मुरुडवरून तांदुळजा मार्गे अंबाजोगाई या शहराला जाणारा रस्ता हा अत्यंत धोकादायक बनला असून सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. रस्ता दुरस्तीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यातील खड्यात वृक्षारोपण करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले तांदुळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तांदूळजा गाव व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाताना या खड्यांना हुलकावणी देत वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याचे काही काम काही दिवसांपूर्वी झाले होते परंतु ते निकृष्ट झाल्याचे गावातील नागरिकांचे व या मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार बांधकाम विभागाला कळवण्यातही आले. मात्र त्यांना ते पाहायला वेळच मिळाला नाही अशीही चर्चा होत आहे.
या मार्गावरून दैनंदिन रहदारी असते शिवाय दुचाकी, ऑटो रिक्षा, शाळेच्या बस व उसाची वाहने तसेच एसटी बसेसची सतत वर्दळ सुरू असते. पादचारी व वाहनधारकांना यातून मार्ग काढताना तारे-वरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. या रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक तांदूळजा ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे किंवा अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्याकडे एखाद्या आजारी रुग्णाला तातडीने घेऊन जायचे असेल तर रस्त्यावरील खड्यामुळे शक्यच होत नाही.
रेड्डी (खटकाळी) चा पूल खचून गेल्यामुळे तर कॅनॉल च्या जवळ पडलेल्या खड्क्यांमुळे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील रस्त्यावरील खड्यामुळे नागरिकांना अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या आठ दिवसांच्या आत जर संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.