One more person taken into police custody in the Chakur murder case
चाकूर, पुढारी वृत्तसेवा: पतीचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेला अडकवण्यासाठी चुलतीने निर्दोष ७ वर्षीय पुतण्याचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी आणखीन एक संशयित आरोपी पोलिसांच्या गळाला लागला. त्याला मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी १९ एप्रिल रोजी देवांश मंगेश स्वामी या ७ वर्षीय बालकाचा त्याची चुलती अनिता दिनेश स्वामी हिने खून करून त्याचा मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यामध्ये टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना चाकूर शहरात उजळंब रोडवरील जुने महादेव मंदिर परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी चुलतीला अटक केली आहे.
दरम्यान या खून प्रकरणात आणखीन कोणी सहभागी आहे का ? याचाही बारकाईने तपास करण्यात आला असता आणखीन एक संशयित आरोपी पोलिसांच्या गळाला लागला आहे. संजय काशिनाथ स्वामी (वय ३४ वर्षे) रा. चाकूर याला मंगळवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने चाकूर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी १९ एप्रिल रोजी मंगेश स्वामी यांचा मुलगा देवांश स्वामी (वय ७ वर्षे) व साईचरण दिनेश स्वामी (वय १० वर्षे) हे दोघे चुलत भाऊ सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेल्यानंतर ते परत आले नाहीत. ही माहिती पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करून शोधाशोध केली असता उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या अडोशाला देवांश मंगेश स्वामी (वय ७ वर्षे) या बालकाचा मृतदेह आढळून आला होता.
मृत देवांशचे वडील मंगेश स्वामी यांनी वहिनी अनिता दिनेश स्वामी हिच्यावर संशय व्यक्त केल्याने तीला चौकशीच्या फेऱ्यात घेताच तिने आपल्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून अनिता व तिच्या पतिमध्ये नेहमी वाद व भांडण तक्रारी होतं होत्या. त्यामुळे स्वतः च्या आणि दिराच्या मुलाचे अपहरणाचा बनाव करून दिराच्या मुलाचा खून करून त्याचा आरोप पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर टाकून तिला अडकवण्यासाठी सदरचा कट रचून तीने निर्दोष देवांशचा खून करून गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यामध्ये टाकून दिला होता.
याचा कोणावरही संशय येऊ नये यासाठी संशयित आरोपी अनिता स्वामीने स्वताचाच मुलगा बेपत्ता असल्याचा खोटा बनाव केला. या घटनेने चाकूर व परिसर हादरला होता. अनिता स्वामीने पुतण्या देवांश याचा निर्घृण खून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता दिनेश स्वामी विरोधात चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
या खून प्रकरणात आणखीन कोणी सहभागी आहे का, याची पोलिसांनी बारकाईने तपासाची चक्रे गतिमान करताच अनिता स्वामी हिने या कटात संजय काशिनाथ स्वामी याचाही सहभाग असल्याचे उघड केले. पोलिसांनी मंगळवारी पहाटे ३ वाजता त्याला अटक करून ताब्यात घेतले आहे. मंगळवारी २१ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला २४ एप्रिल शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे करीत आहेत.